रेडक्रॉस यांच्याकडे फेसशिल्ड केले सुपूर्द
प्रतिनिधी / बेळगाव
जम्मू काश्मीर, लेह-लदाख या ठिकाणी कोरोना काळात कोरोना योद्धय़े म्हणून कार्य करणाऱया आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. डोंगर कपाऱयामध्ये चालत जाऊन त्या सर्वसामान्य जनतेची सेवा करत आहेत. अत्यंत थंड असलेल्या या ठिकाणी ते काम करत आहेत. त्यांना काही तरी आपण मदत करणे हे कर्तव्य आहे हे समजून त्यांच्यासाठी व्हेगाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप चिंडक यांनी 48 फेसशिल्ड दिले आहेत.
रेडक्रॉस या संस्थेकडे त्यांनी हे फेसशिल्ड सुपूर्द केले आहेत. रेडक्रॉसचे पदाधिकारी हे फेसशिल्ड आता बेंगळूर येथील आपल्या मुख्य शाखेकडे पाठविणार आहेत. त्यानंतर ते श्रीनगर येथील रेडक्रॉसच्या शाखेकडे पाठवून दिले जाणार आहेत. दिलीप चिंडक यांनी जी मदत केली आहे ती मोलाची आहे. कोरोना काळात अशा प्रकारे अत्यंत दुर्गम भागातील कोरोना योद्धय़ांना ही मदत केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
कोरोना रुग्णांवर उपचार तसेच लस देण्यासाठी तेथील कोरोना योद्धय़े काम करत आहेत. अत्यंत दुर्गम भागामध्ये आणि थंडीच्या ठिकाणी काम करताना त्यांना फेसशिल्डची गरज आहे. त्याचा विचार करूनच दिलीप चिंडक यांनी ही मदत केली आहे. याबद्दल रेडक्रॉसने त्यांचे आभार मानले आहेत.