हॉटेल व्यावसायिकाच घरावर डल्ला, लपवलेल्या चावीने उघडले घर
वार्ताहर / मंडणगड
घराबाहेरील स्नानगृहाच्या कडाप्प्यावर लपवलेल्या चावीने कुंबळे येथील हॉटेल व्यावसायिकाचे घर उघडून सोन्याचे दागिने व रोख रकमेसह तब्बल 5 लाख 49 हजाराचा ऐवज चोरटय़ांनी लांबवला आहे. या प्रकरणी मंगळवारी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी एकास संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. मात्र चौकशीअंती सोडून देण्यात आले.
कुंबळे-लोखंडीवाडी येथील हॉटेल व्यावसायिक आकाश लोखंडे (26) मंगळवारी घर बंद करून नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये गेले होते. रात्री काम संपवून ते नेहमीप्रमाणे घरी आले असता मंगळवारी सकाळी 11.30 ते सायंकाळी 7.30 दरम्यान चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आहे. चोरटय़ाने घराच्या बाथरुमच्या कडाप्यावर ठेवलेली चावी मिळवून घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. यानंतर लोखंडी कोयतीने घरात असलेले लोखंडी कपाट फोडून लॉकरमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबवून पुन्हा चावी होती तेथे ठेवली.
चोरीस गेलेल्या मुद्देमालात 1 लाख 50 हजाराचे सोन्याचे मंगळसूत्र, 1 लाख 20 हजाराचे पट्टीचे मंगळसूत्र, 60 हजार रुपये किंमतीची चेन, 60 हजार रुपये किंमतीचे ब्रेसलेट, 8 हजार रुपये किंमतीच्या 3 ग्रॅम वजनाच्या 2 अंगठय़ा, 8 हजार किंमतीच्या कानातील कुडय़ा, 45 हजार रुपये किंमतीचा सोन्याची बोरमाळ, 11 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या वाटय़ा व चार मणी व 80 हजार रुपयांच्या रोख रक्कमेचा समावेश आहे.
दरम्यान, या प्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या एकास चौकशीअंती सोडून देण्यात आले. मात्र लपवलेल्या चावीने घर उघडल्याने ही चोरी लोखंडे कुटुंबियांच्या परिचयातील व्यक्तीने केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मधुकर वराळे अधिक तपास करीत आहेत.