झाग्रेब / वृत्तसंस्था
मदतीचा, सहकार्याचा हात पुढे करताना ना जात पहायची असते, ना धर्म. क्रोएशियाचा जागतिक क्रमवारीतील तिसरा मानांकित नेमबाज पीटर गोर्सा याने तर भारताने कठीण काळात केलेल्या मदतीच्या उपकारातून उतराई होण्यासाठी अगदी आंतरराष्ट्रीय सीमांचाही विचार केला नाही. त्याही त्याने बेधडक ओलांडल्या आणि त्याच्या पुढाकारामुळेच भारतीय नेमबाजी संघाचे पथक आता क्रोएशियात पोहोचले आहे. या भारतीय पथकात 13 नेमबाज, 7 प्रशिक्षक, 5 फिजीओ व दोन सदस्यीय व्हीडिओ क्य्रूचा समावेश आहे. भारताचे ऑलिम्पिकपात्र आणखी दोन स्कीट नेमबाज अंगद वीर सिंग बजवा व मैराज अहमद सध्या इटलीत आहेत.
33 वर्षीय पीटर गोर्सा हा क्रोएशियाचा जागतिक क्रमवारीतील तिसरा मानांकित नेमबाज. भारतात मार्चमध्ये विश्वचषकासाठी आला असताना त्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. मात्र ऑलिम्पियन रोंजन सिंग सोधी व एनआरआयचे अध्यक्ष रनिंदर त्याच्या मदतीसाठी धावून आले आणि कोरोनावर मात केल्यानंतर गोर्सा सुखरुप मायदेशी परतला. अर्थात, भारताने केलेल्या या मदतीची आठवण मनात ठेवलेल्या गोर्साने इतर सर्व देशांचे दरवाजे प्रशिक्षणासाठी बंद असताना भारतीय नेमबाजी पथकाला क्रोएशियाचे दरवाजे उघडून अगदी शब्दशः रेड कार्पेट अंथरुन दिले. भारतीय नेमबाज पथक सध्या क्रोएशियात सराव करत असून तेथूनच ते टोकियो ऑलिम्पिकसाठी जपानला रवाना होणार आहेत.
पीटर गोर्सा मार्चमध्ये नवी दिल्लीतील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात आला होता. पण, भारतात दाखल होताच त्याच्या अडचणींना सुरुवात झाली होती. सर्वप्रथम कस्टम्समधून त्याच्या इक्विपमेंट्सना क्लियरन्ससाठी 6 तासांची प्रतीक्षा करावी लागली. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर बायो-बबलचे पालन झाले नसल्याचे निदर्शनास आले आणि इतके कमी होते की काय म्हणून तो कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.
8 दिवस इस्पितळात
कोरोना पॉझिटिव्ह असल्याने या रायफल शूटरला स्पर्धेतून माघार घेणे तर क्रमप्राप्तच होते. पुढे त्याला इस्पितळातही दाखल व्हावे लागले. इस्पितळात दोन दिवसांऐवजी आठ दिवस थांबावे लागल्याने तो आणखी बेचैन झाला. पण, याचवेळी ऑलिम्पियन रोंजन सिंग सोधी व भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रनिंदर सिंग त्याच्या मदतीला धावून आले. त्यांनी इस्पितळ प्रशासनाकडून गोर्साच्या तब्येतीची माहिती घेतली आणि सातत्याने संपर्कात राहिले. इस्पितळातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गोर्साने आयसोलेशनचा कालावधी रनिंदर यांच्या घरीच पूर्ण केला.
‘मी पॉझिटिव्ह असताना त्यांनी मला कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे वागवले. रनिंदर व माझा मित्र रोंजन यांनी सर्व काळजी घेतली आणि प्रतिकूल स्थितीतही काहीही कसर पडू दिली नाही. याचमुळे मी कोव्हिडवर मात करुन आयसोलेशन कालावधीही पूर्ण करु शकलो’, असे गोर्सा त्याबद्दल बोलताना म्हणाला.
उतराईचा प्रयत्न
गोर्सा त्यानंतर मायदेशी परतला आणि इकडे टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय नेमबाजांना सराव कुठे करायचा, हा यक्षप्रश्न पडला. भारतात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना जवळपास सर्व देशांनी भारतातून येणाऱया प्रवाशांवर बंदी घातली होती. क्रोएशियाचा पर्याय खुला होता. पण, व्हिसा व पेपरवर्क क्लिष्ट स्वरुपाचे होते. त्यानंतर एका रविवारी रनिंदर यांनी गोर्साच्या कानावर ही अडचण घातली आणि तिथून पुढे एक मोठे ऑपरेशन क्रोएशियात सुरु झाले.
गोर्सा, सुदर, झाग्रेब नेमबाजी फेडरेशनचे सचिव विस्न्जिका क्वेसिक यांच्यासह 6 सदस्यांच्या पथकाने क्रोएशियातील क्रीडा, पोलीस, फॉरेन अफेयर्स, संरक्षण व क्रोएशियन ऑलिम्पिक समितीशी संपर्क साधणे सुरु केले व त्यातून सर्व औपचारिकता पूर्ण केल्या गेल्या. अवघ्या चार दिवसातच भारतीय पथकाला क्रोएशियात पोहोचता यावे, यासाठी सर्व तजवीज वेगाने केली गेली आणि याचमुळे भारतीय नेमबाजी पथक एव्हाना क्रोएशियात पोहोचले आहे.
पत्नी हॉस्पिटलमध्ये, नुकतेच पुत्ररत्न, तरीही गोर्सा विमानतळाकडे धावला!
मंगळवारी भारतीय संघ क्रोएशियात उतरणार होता, त्यावेळी काही तासांपूर्वीच गोर्सा इस्पितळात होता. गोर्सा दाम्पत्याला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. पण, काही वेळातच गोर्साने भारतीय नेमबाजी पथकाचे स्वागत करण्यासाठी थेट विमानतळाचा रस्ता धरला. गोर्सा व झागेब नेमबाजी फेडरेशनचे उपाध्यक्ष ऍन्टन सुदर यांनी भारतीय संघाला त्यांच्या हॉटेलपर्यंत पोहोचवले. इतकेच नव्हे तर भारतीय पथकातील सर्व नेमबाजांचे ऍम्युनिशन त्यांनी शहरातील शुटिंग रेंजवर पोहोचते केले. परत घरी पोहोचून गोर्सा झोपी गेला, तेव्हा पहाटे 5 वाजले होते.
भारतीय नेमबाज ऑलिम्पिकपूर्वी दोन स्पर्धांमध्येही भाग घेणार
सध्या क्रोएशियात असलेले भारतीय नेमबाज सर्वप्रथम 7 दिवसांचे क्वारन्टाईन पूर्ण करतील आणि ऑलिम्पिकपूर्वी दोन स्पर्धांमध्ये देखील सहभागी होणार आहेत. पुढील आठवडय़ात ओसिजेक येथील युरोपियन चॅम्पियनशिप आणि झाग्रेबपासून तीन तासाच्या अंतरावर घाईघाईने आयोजित केलेल्या विश्वचषक स्पर्धेत हे पथक सहभागी होईल
सध्या भारतातून जपानला प्रवास करणे अशक्य
जपानने भारतासह ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान व नेपाळ या देशातून येणाऱया प्रवाशांवर बंदी लादली असल्याने सध्या भारतातून जपानला प्रवास करणे अशक्य आहे. क्रोएशियातून जपानला पोहोचण्यावर मात्र काहीच बंधने नसल्याने भारतीय नेमबाजांसाठी हा प्रश्न देखील चुटकीसरशी सुटण्यासारखा असणार आहे. सध्याच्या रुपरेषेनुसार, यंदाचे ऑलिम्पिक 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.
भारताचे ऑलिम्पिक पात्र नेमबाज पथक
10 मीटर्स रायफल पुरुष ः दिव्यांश सिंग पनवर, दीपक कुमार. राखीव ः संदीप सिंग, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर.
50 मीटर्स रायफल 3 पोझिशन पुरुष ः संजीव रजपूत, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर. राखीव ः स्वप्नील कुसाळे, चैन सिंग.
10 मीटर्स एअर पिस्तोल ः सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा. राखीव खेळाडू ः शाहझर रिझवी, ओम प्रकाश मिथरवाल.
10 मीटर्स एअर रायफल महिला ः अपूर्वी चंदेला, इलावेनिल वलरिवन. राखीव खेळाडू ः अंजुम मोदगिल, श्रेया अगरवाल.
50 मीटर्स रायफल 3 पोझिशन महिला ः अंजुम मोदगिल, तेजस्विनी सावंत. राखीव खेळाडू ः सुनिधी चौहान, गायत्री एन.
10 मीटर्स एअर रायफल पिस्तोल महिला ः मनू भाकर, यशस्विनी सिंग देस्वाल राखीव ः पी. श्री निवेता, श्वेता सिंग.
25 मीटर्स पिस्तोल महिला ः राही सरनोबत, मनू भाकर. राखीव ः चिंकी यादव, अभिज्ञा पाटील.
स्कीट पुरुष ः अंगदवीर सिंग बाजवा, मैराज अहमद खान. राखीव ः गुरजोत सिंग, शिराज शेख.
10 मीटर्स एअर रायफल मिश्र ः दिव्यांश सिंग पनवर, इलावेनिल वलरिवन, दीपक कुमार, अंजुम मोदगिल.
10 मीटर्स एअर पिस्तोल मिश्र ः सौरभ चौधरी, मनू भाकर, अभिषेक वर्मा, यशस्विनी सिंग देस्वाल.