लॉकडाऊनमुळे गोव्याचा 80 वर्षीय वृद्ध बेळगावात अडकला, महिन्याभरापासून खाण्या-पिण्याचे हाल
बेळगाव / प्रतिनिधी
देशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. आंतरराज्य सीमाही सील करण्यात आल्याने परराज्यांतून आलेले अनेक जण अडकून पडले आहेत. मारुती गल्ली, बेळगाव येथील वृंदावन लॉजमध्ये गोवा येथील एक 80 वर्षाचा वृद्ध लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अडकून पडला आहे.
प्रकाश वर्दे असे या वृद्धाचे नाव असून मंगळवारी तरुण भारतच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली असता त्यांनी आपण महिन्याभराहून अधिककाळ अडकून राहिलो. त्यामुळे अतोनात हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले.
वृंदावन लॉजमध्ये सध्या वास्तव्य
वर्दे हे कामानिमित्त लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी रत्नागिरीला गेले होते. तिकडून परतताना कामासाठी बेळगावात उतरले आणि बेळगाव मारुती गल्ली येथील वृंदावन लॉजमध्ये राहायला गेले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दि. 22 मार्च रोजी जनता कर्फ्युचा आदेश दिला आणि सर्व वाहतूक व्यवस्था बंद झाली. त्यानंतर देशात लॉकडाऊन सुरू झाला आणि वर्दे गेल्या महिन्याभराहून अधिककाळ अडकून पडले.
पोलीस प्रशासनाच्या उत्तराने वृद्ध निराश
दरम्यान, त्यांनी पोलीस प्रशासनाकडे गोव्याला पोहोचविण्याची विनंती केली. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर गावाकडे जा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे वर्दे निराश व हताश झाले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या घरापासून लांब राहिलेल्या या वृद्धाला आता आपल्या मूळ गावी जाण्याची आस लागली आहे.
आता लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढविल्यास
वृद्धासमोर चिंता
या लॉजमध्ये दोन कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी तयार करण्यात येणाऱया भोजनामधून त्यांची जेवणाची सोय केली जात आहे. मात्र, आता त्यांच्याजवळ पैसेही नसल्यामुळे गोव्याला जाणे अडचणीचे बनले आहे. त्यातच आता लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढविल्यास वृद्ध मोठय़ा अडचणीत सापडणार आहे. त्यामुळे मला कोणी तरी गोव्याला पोहचवा रे बाबांनो! असे हा वृद्ध सांगत आहे.