वृत्तसंस्था / वॉशिंग्टन :
जग महामारीला तोंड देत असताना चीन स्वतःचे कट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. चीन काय करतोय आणि त्याचे उद्देश कुठले आहेत, हे भारतासोबतच्या अलिकडच्या उदाहरणातून समजून येते. याचबरोबर बीजिंगचा मनसुबा दर्शविणारे अनेक पुरावे समोर आल्याचे विधान अमेरिकेचे मुत्सद्दी डेव्हिड स्टिलवेल यांनी केले आहे. चीन स्वतःचे बळ वाढविण्यासाठी पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमारमध्ये सैन्यतळ निर्माण करू पाहत असून त्यावर नजर असल्याचे पेंटागॉन या अमेरिकेचा संरक्षण विभागाने म्हटले आहे.
जगासमोर महामारीचे संकट असताना सहन करता न येणाऱया कारवाया चीन करत आहे. चीनच्या कारवायांना भारत सध्या सामोरा जात आहे. जर कुठला वाद असल्यास तो चर्चेद्वारे सोडविण्यात यावा, असे बीजिंगमधील स्वतःच्या मित्रांना सांगू इच्छितो असे अमेरिकेच्या विदेश विभागात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेले मुत्सद्दी स्टिलवेल यांनी म्हटले आहे.
पेंटागॉनचा नवा अहवाल
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने एक नवा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात आशियाचा विशेषकरून उल्लेख आहे. चीन अत्यंत वेगाने आणि आक्रमकपणे वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार यासारख्या छोटय़ा देशांमध्ये सैन्यतळ निर्माण करण्याचा चीनचा डाव असून याकरता तो अनेक प्रकारचे कट रचत आहे. या अहवालात आणखी काही देशांचीही नावे आहेत. चीनचे डाव हाणून पाडण्यासाठी व्यूहनीती आखण्यासह त्याच्या हालचालींवर अमेरिका नजर ठेवून असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.