नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना रोखण्याची साधने, औषधे, लसी तसेच ब्लॅक फंगसवरील औषधे यांच्यावरील कर कमी करण्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी वस्तू-सेवा कर मंडळाची (बैठक) आज शनिवारी होणार आहे. ती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेत होईल. या बैठकीत बव्हंशी राज्यांचे अर्थमंत्री समाविष्ट होणार आहेत. कोरोना काळात औषधे, व्हेंटिलेटर्स व इतर साधने लोकांना वाजवी खर्चात उपलब्ध व्हावीत, यासाठी त्यांच्यावरील सीमाशुल्क आणि इतर कर कमी करावेत अशी मागणी आहे. या मागणीवर या बैठकीत विचार होऊन निर्णय होण्याची अपेक्षा आहे. यासंदर्भातील अहवाल विशेष मंत्रिगटाने केंद्र सरकारला चार दिवसांपूर्वी सादर केल्याचे सांगण्यात आले आहे.
अनेक साधने आणि औषधे यांची आयात आता आवश्यक झाल्याने कर कमी करण्यात यावेत. कोरोनाप्रमाणेच ब्लॅक फंगस हा विकारही मोठय़ा प्रमाणात पसरला आहे. त्यावरील औषधे तातडीने उपलब्ध होणे आवश्यक असल्याने निर्यात प्रक्रिया सोपी करावी अशीही मागणी आहे. सध्याही या औषधांवरील करांमध्ये काही प्रमाणात कपात करण्यात आली आहे. मात्र, सीमाशुल्क पूर्णतः रद्द करण्यात यावे अशी मागणीही करण्यात येत असून या सर्व मुद्दय़ांवर या बैठकीत सविस्तर चर्चा शक्य असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली आहे.
TAR