प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत मागासवर्गियांसाठी आरक्षित असलेला 12 प्रभागात रिपाइं महायुतीतून लढणार आहे. रिपाइं भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांसंदर्भात लवकरच भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा होणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी सांगितले.
मंत्री आठवले म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी आपण नुकतीच यासंदर्भात चर्चा केली. चर्चेत विधान परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवावरही विचारमंथन झाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी आगामी महापालिका निवडणुकांत महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी रिपाइं ठामपणे उभा राहील. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत मागासवर्गीयांसाठी असलेल्या 12 प्रभागांत रिपाइंला संधी द्यावी, अशी मागणी आहे. मुंबई, पुण्यातील निवडणुकांत 5 ते 10 टक्के जागा मागितल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
पश्चिम बंगालमधील निवडणुकांत भाजपसंदर्भात चांगले वातावरण आहे. तेथे विधानसभेसाठी नवा पर्याय आहे. पश्चिम बंगालमध्ये रिपाइं 6 जागा महायुतीच्या माध्यमातून लढवणार आहे. कोल्हापूर महापालिकेत महायुती, भाजपची सत्ता आल्यास उपमहापौरपदाची मागणी निश्चितच केली जाईल, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
कोरोना नियंत्रणात केंद, राज्य सरकारचे महत्वपुर्ण योगदान
देशात, राज्यात कोरोना नियंत्रणात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या घेतलेल्या निर्णयामुळे जास्तीत जास्त भारतीयांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियंत्रणासाठी चांगली भुमिका घेतली आहे. आपण सर्वप्रथम गो कोरोना गोचा नारा दिला, आता वर्षअखेरीस ते दिसून आले आहे. कोरोना काळात अनेकांचे रोजगार बुडाले, पण त्यांच्यासाठी `आत्मनिर्भर भारत’मधून केंद्र सरकारने विविध योजना आणल्याचे त्यांनी स्पष्ट केले.