कुलगुरू शोध समितीचे शासन प्रतिनिधी मिलींद म्हैसकर आज राज्यपाल कोश्यारी यांना भेटणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ कुलगुरु पदासाठीच्या मुलाखतींची प्रक्रिया रविवारी पार पडली. कुलगुरु शोध समितीकडून दोन दिवसात 28 उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या. यापैकी 5 उमेदवारांची नावे राज्यपालांकडे सादर करण्यासाठी आज कुलगुरु शोध समितीचे शासन प्रतिनिधी मिलींद म्हैसकर राज्यपालांची भेट घेणार आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा 17 मार्च रोजी कार्यकाल संपला. त्यांच्या रिक्त जागी कुलगुरूंची निवड प्रक्रिया मार्च महिन्यापासून सुरू होती. आयएएस अधिकारी मिलींद म्हैसकर, राष्ट्रीय केमिकल लॉबॉटरी संचालक अश्विनी कुमार नांगिया, रक्षा अनुसंधान व विकास संघटनचे चेअरमन व्ही, सतीश रेड्डी यांची कुलगुरू शोध समिती तयार करण्यात आली. कुलगुरू पदासाठी तब्बल 169 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 25 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. पात्र उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया रविवारी पार पडली.
कुलगुरू शोध समितीकडून 25 उमेदवारांपैकी उत्तम मुलाखत झालेल्या 5 उमेदवारांची नावे राज्यपालांच्याकडे सादर करावयाची असतात हा नियम आहे. त्यामुळे आज कुलगुरू शोध समितीचे शासन प्रतिनिधी मिलींद म्हैसकर आज राज्यपालांना भेटणार आहेत. येत्या काही दिवसात राज्यपाल या पाच उमेदवारांच्या मुलाखती घेवून, यापैकी एकाची नियुक्ती शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी करणार आहेत. या पाच नावांपैकी कोणाची वर्णी लागणार याकडे शिक्षण वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विद्यापीठ वर्तुळाला नूतन कुलगुरूंची प्रतिक्षा
गेल्या सहा महिन्यापासून विद्यापीठाचा कारभार प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर सांभाळत होते. त्यांच्याकडे पुणे आणि शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार असल्याने. शिवाजी विद्यापीठाला पुरेसा वेळ देणे शक्य नव्हते. परंतू नूतन कुलगुरु रूजू झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनासह प्राध्यापकांचे बरेच प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, अशी कर्मचाऱयांना आशा आहे. त्यामुळे विद्यापीठ वर्तुळाला नूतन कुलगुरूंची प्रतिक्षा आहे.