प्रतिनिधी/कोल्हापूर
गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या कायम आहे. दिवसागणित 50 ते 100 कोरोनाग्रस्तांचा आकडा ओंलाडत आहे. तर मागील दोन दिवसापासून हा आकडा 200 च्या पुढे गेला आहे. यामुळे प्रशासनाबरोबरच नागरिकांच्याही चिंतेत वाढ झाली आहे.
यातच आज, रविवार सकाळी दहा वाजेपर्यंत 31 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. यात जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. याआधीही जिल्हा परिषदेमधील एका विभागात कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. आता चक्क उपाध्यक्षांनाच कोरोनाची लागण झाल्याने सगळयाचे धाबे दणाणले आहेत.
काल, शनिवारी कोरोनाने तिघांचा बळी गेला होता. यामुळे जिल्ह्यातील बळीची संख्या आता 46 झाली आहे. तर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2135 वर पोहचली आहे. यातील 984 रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान कोरोनाची ही वाढती संख्या रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात उद्या, सोमवार (दि.20) पासून पुन्हा एकदा सात दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा, व्यवहार, वाहतुकीवर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान यावेळी ई-पासची सुविधा देखील बंद करण्यात आली आहे.