वार्ताहर / पाचगाव
पाचगावात कोरोनाचा कहर वाढत असून बुधवारपर्यंत एकूण २१७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
पाचगावात 15 जुलै रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर केवळ दोन महिन्याच्या आत पाचगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 217 झाली आहे. यापैकी 138 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी ग्रामस्थांनी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे, योग्य आहार घ्यावा, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक व्ही आय कुंभार, आरोग्य सेविका सी. जे. चोपडे, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच विष्णू डवरी, ग्रामसेवक लंबे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी पाचगावात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.