प्रतिनिधी / पेठ वडगाव
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्व्हेक्षण २०२० स्पर्धेत वडगाव पालिकेने थ्री स्टार मानांकन मिळविले असून देशात बारावा तर राज्यात पाचवा क्रमांक पटकावला. वडगाव शहरातील सर्व घटकांच्या सहकार्यामुळे पालिकेस हा बहुमान मिळाला असल्याचे सांगून युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे यांनी सांगून शहरातील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२० या स्पर्धेमध्ये देशातील ४ हजार २४२ शहरांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविलेल्या शहरांचे सर्वेक्षण करणेत आले होते. यामध्ये वडगांव शहराचा संपूर्ण देशामध्ये १२ वा तसेच २५ ते ५० हजार लोकसंख्या असणार्या नगरपरिषदांच्या गटांमधून राज्य पातळीवरील १०७ नगरपरिषदामधून पाचवा क्रमांक प्राप्त तर पश्चिम विभागामधील २९९ नगरपरिषदामधूनही पाचवा क्रमांक प्राप्त झाला आहे.
या स्पर्धेत कचरामुक्त शहरामध्ये वडगांव शहरास सर्वेक्षण २०२० मध्ये थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. तसेच हागंदारी मुक्त शहर या प्रकारामध्ये असणार्या चार टप्यापैकी ३ ज्या टप्प्याचे ओडीएफ प्लस प्लस दर्जाचे मानांकन प्राप्त झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये झालेल्या प्रत्यक्ष पहाणीमध्ये व सादर केलेल्या सर्व कागदपत्रांचे आधारे व या स्पर्धेमध्ये शहरातील कचरा संकलन वहातूक व प्रक्रिया, सार्वजनिक व सामुदायिक शौचालय स्वच्छता तसेच शहरामधील दैनंदिन साफसफाई करणे या बाबींसाठी शहरामधील वेगवेगळया भागातील नागरीकांना फोन कॉल द्वारे प्रश्न विचारुन नागरीकांचे अभिप्राय घेवून प्रत्यक्ष पहाणी करण्यात आली. या पाहणीमध्ये वेगवेगळे घट पाहण्यात आले. त्यामध्ये प्रमुख्याने घनकचरा व्यवस्था प्रकल्प, शहराती रहिवासी व व्यापारी भाग व भागातील रस्ते , गटर्स, स्वच्छता, अभियानाच्या जनजागृतीचे पेटींग, पोस्टर्स, सार्वजनिक व सामुदाईक शौचालय स्वच्छता, तसेच शहरामधील प्रत्येक प्रभागामधील नागरीकांचे प्रत्यक्ष अभिप्राय घेणेत आले व त्यानुसार वडगांव शहरास प्रत्येक प्रकारामध्ये असणा-या गुणानुक्रमानुसार गुण देणेत आले.
यामुळे देश पातळीवर वडगांव शहरास बारावा व राज्य पातळीवर व पश्चिम विभागामध्ये पाचवा क्रमांक प्राप्त झाला. वडगांव शहराने स्वच्छतेच्या बाबतीत घेतलेली ही गरुड झेप कौतुकास्पद आहे. या करिता वडगांव शहरातील सर्व प्रभागामधील नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी व नागरीक, पत्रकार, व्यापारी, सेवाभावी संस्था, शिक्षण संस्था, हॅास्पीटल्स, हॉटेल्स यांचे मालक व नगपरिषदेमध्ये काम करणारे सर्व सफाई कर्मचारी, अधिकारी व इतर विभागामधील सर्व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.या बद्दल सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे व नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांनी वडगाव शहरातील नागरीकांसह सर्व घटकांचे आभार व्यक्त केले.
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ ची पुढील टप्याची केंद्र शासनाच्या वतीने घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये कचरा मुक्त शहर प्रकारामधील किमान फाइव्ह स्टार दर्जाचे प्रमाणपत्र व हागणदारीमुक्त शहर या प्रकारामधील चौथ्या टप्याचे वॉटर प्लस हे मानांकन प्राप्त करुन घेणेचे ध्येय नगरपरिषदेने ठरविले आहे. यामुळे शहराच्या नाव लौकीकेमध्ये भर पडेल. यासाठी शहरातील सर्व नागरिकांचे सहकार्य मिळावे असे आवाहन युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष शरद पाटील, महाआघाडीचे संघटक अजय थोरात, नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी यांनी केले.