मंत्री उमेश कत्ती यांचे आवाहन – वाढदिवस कुटुंबीयांसमवेत साधेपणाने साजरा करणार
प्रतिनिधी/ संकेश्वर
मला आज 60 वर्षे पूर्ण होत असून मी एकसष्ठीमध्ये पदार्पण करत आहे. यातील सुमारे 40 वर्षे राज्याच्या राजकारणात सक्रीयपणे काम करण्याची संधी जनतेने मला आशीर्वादाच्या रुपाने दिली आहे. या संधीचे सोने करण्याचा यशस्वी प्रयत्न मतदारसंघातील विकासकामातून मी करीत आहे. मतदारांच्या विश्वासाला पात्र ठरत 61 व्या वर्षीही मंत्रिपदाची धुरा सांभाळत जनतेची सेवा करीत आहे. यापुढेही सरकारच्या विविध योजनांचा लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी तत्पर आणि आघाडीवर असणार आहे. दरम्यान, कोरोनामुळे आपला वाढदिवस आपण साधेपणाने कुटुंबीयांसमवेत साजरा करणार आहे, अशी माहिती मंत्री उमेश कत्ती यांनी दिली.
कत्ती पुढे म्हणाले, सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दुसऱया टप्प्यात विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. त्यामुळे माझा 61 वा वाढदिवस मी माझ्या कुटुंबीयांसमवेत बेंगळूर येथील निवासस्थानी साजरा करीत आहे. दुसऱया टप्प्यातील कोरोनाचे गांभीर्य घेत प्रत्येकांनी सुरक्षित रहावे, सामाजिक अंतर ठेवावे, मास्कचा अधिकाधिक उपयोग करावा व सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.