वेळणेश्वरमधील कोविड केअर सेंटर गुरूवारपासून बंद
प्रतिनिधी/ गुहागर
गुहागर तालुक्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्याने तालुक्यासाठी वेळणेश्वर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात असलेले कोविड केअर सेंटर बंद करून गुहागरातील रूग्णांसाठी आता दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठामधील कोविड केअर सेंटर ठरवून देण्यात आले आहे. मात्र गुहागरला चिपळूण जवळ असताना दापोली सेंटर दिल्याने पॉझिटीव्ह रूग्णांचा प्रवास खडतर होणार आहे.
गुहागर तालुक्याची कोरोना रूग्णसंख्या कमी झाली आहे. वेळणेश्वरच्या कोविड केअर सेंटरमध्ये केवळ 2 रूग्ण होते. त्यामुळे गुरूवारपासून हे सेंटर बंद करण्याचे आदेश मिळाल्याने या दोन्ही रूग्णांना होम क्वारंटाईनसाठी घरी सोडण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलेल्या आदेशानुसार गुरूवारपासून वेळणेश्वरमधील सेंटर बंद करण्यात आले असून त्याठिकाणी नेमण्यात आलेल्या 2 अधिपरिचारिका, 2 डॉक्टर व 2 शिपाई अशा सहाजणांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. गुहागर तालुक्यासाठी वेळणेश्वर हे ठिकाण सोयीचे होते, परंतु आता हेच सेंटर दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठात देण्यात आल्याने गुहागर ते चिपळूण-खेड व नंतर दापोली, तर दुसऱया बाजूने गुहागर ते धोपावेमार्गे दापोली असा प्रवास करावा लागणार आहे. धोपावे मार्गे जाताना फेरीबोटीमध्ये वाहन टाकून प्रवास करावा लागणार आहे. यामुळे दापोली हे ठिकाण तालुक्यातील रूग्णांसाठी खडतर प्रवासाचे ठरणार आहे.
सौम्य लक्षणे असणाऱयांना दापोलीतील या नव्या सेंटरमध्ये भरती केले जाणार आहे, परंतु ज्यांना मोठय़ाप्रमाणात त्रास आहे अशा गुहागरातील रूग्णांना उपचारासाठी रत्नागिरीऐवजी दापोली उपजिल्हा रूग्णालय व कळंबणी उपजिल्हा रूग्णालय देण्यात आले आहे. गुहागर तालुक्यात आतापर्यंत एकूण 658 पॉझिटीव्ह रूग्ण संख्या झाली आहे. यातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अजून 29 रूग्ण ऍक्टीव्ह आहेत. यातील 18 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून कामथे रूग्णालयात 9, तर खासगी रूग्णालयात 2 रूग्ण उपचार घेत आहेत. एकूण 12 कन्टेन्टमेंट झोन ऍक्टीव्ह आहेत.
आमदारांनी दिलेल्या रूग्णवाहिकेमुळे रूग्णांना दिलासा
आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून गुहागरसाठी सुसज्ज अशी रूग्णवाहिका दिली आहे. ही रूग्णवाहिका जिल्हा रूग्णालयाकरिता दिली असल्याने गुहागर ग्रामीण रूग्णालयामार्फत ती चालवली जाणार आहे. या रूग्णवाहिकेतून कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना ने-आण करणे सोयीचे ठरणार आहे. आतापर्यंत या रूग्णवाहिकेसाठी चालक दिलेला नव्हता परंतु वेळणेश्वर कोविड केअर सेंटरकरिता देण्यात आलेला चालक हा तेथील सेंटर बंद पडल्याने या नव्या रूग्णवाहिकेवर काम करणार आहे. गुहागरसाठी केवळ 108 ही एकमेव रूग्णवाहिका कार्यरत होती, परंतु आता ही दुसरी रूग्णवाहिकाही गुहागर ग्रामीण रूग्णालयामार्फत सुरू होणार असल्याने व कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाला सेंटर अथवा उपचारासाठी हलवण्याकरिता मोफत सेवा दिली जाणार असल्याने गुहागरातील रूग्णांना दिलासा मिळणार आहे.