पत्रकारांसह, बँक संचालक लक्ष्य
प्रतिनिधी/ गुहागर
शहरातील चिपळूण अर्बन बँकेचे संचालक अजय खातू, पत्रकार मनोज बावधनकर व अमोल गोळे यांची फेसबुक अकाऊंट्स शनिवारी रात्री हॅक झाली. या अकाऊंट्सवरून फेसबुक प्रेंडकडे पैशाची मागणी केली गेल्याने हा प्रकार उघडकीस आला.
शनिवारी रात्री शहरातील चिपळूण अर्बन बँकेचे संचालक खातू, पत्रकार बावधनकर व गोळे यांच्या फेसबुक मित्रांना मेसेंजरवर ‘मला पैशांची गरज आहे, तातडीने पैसे पाठवून द्या, गुगल पे करणार की पेटीएमने करणार ते सांगा, तसे तपशील मी देतो’ असे संदेश प्राप्त होऊ लागले. हे संभाषण हिंदीमध्ये होते. काहींनी याकडे दुर्लक्ष केले तर काहींच्या लक्षातही आले नाही. मात्र वरचापाट येथील व्यापारी अद्वैत गोखले यांनी रात्री ही गोष्ट खातू यांना तर विक्रम खरे यांनी बावधनकर यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिघांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे समोर आले. याप्रकरणी मनोज बावधनकर व अजय खातू यांनी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.