बेकवाड ग्रा.पं.विरोधात खानापूर ता. पं. कार्यालयावर मोर्चा-धरणे आंदोलन
बातमीदार /खानापूर
बेकवाड ग्रा. पं. क्षेत्रातील खैरवाड येथे हाती घेण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी खानापूर तालुका पंचायतसमोर सोमवारपासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. यात महिलांसह शेकडो कामगार व नागरिक सहभागी झाले आहेत.
सोमवारी सकाळी 11 वाजता खैरवाड येथील रोहयो कामगार व ग्रामस्थ मोर्चाद्वारे तालुका पंचायत कार्यालयाकडे आले. त्यांनी तालुका पंचायत कार्यालय आवारात धरणे आंदोलन सुरू केले आहे. बेकवाड ग्रा. पं. क्षेत्रातील खैरवाड येथे रोहयोंतर्गत पूल आणि भराव व संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात आले होते. रोहयो काम करताना यंत्राचा वापर करण्यात आला आहे. शिवाय जे रोजगाराला जातच नाहीत, अशांच्या नावे रोजगार कामाला गेले असल्याचे भासवून त्यांच्या नावे बिले काढण्यात आली आहेत. अशाप्रकारे ग्राम पंचायतीने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी. ग्राम पंचायतीने खऱया गोरगरीब कामगारांना रोहयोतील कामे न देता त्यांच्यावर अन्याय केलने हे आंदोलन करण्यात येत आहे.
अन्यायग्रस्त कामगारांना रोहयोतील कामे द्यावीत, आदी मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करीत असल्याची माहिती ग्रा. पं. सदस्य रुक्माण्णा झुंजवाडकर यांनी यावेळी दिली. या आंदोलनात ग्रा. पं. सदस्या नूतन भुजगुरव यांच्यासह अनेक महिला व नागरिक सहभागी झाले आहेत.