सर्बियातील चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्कार, रत्नागिरीच्या मुलांनी केलेली शॉर्टफिल्म लक्षवेधी
प्रतिनिधी / चिपळूण
सर्बिया येथे झालेल्या न्यू जनरेशन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये रत्नागिरीच्या मुलांनी एकत्र येऊन केलेल्या वाय. पी. प्रॉडक्शनच्या पहिल्याच ’गोष्ट एका कावळय़ाची’ या शॉर्टफिल्मवर आंतरराष्ट्रीय मोहोर उमटली आहे. या महोत्सवात या शॉर्ट फिल्मला ‘हॉनरेबल मेंशन’ म्हणजेच विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. यामध्ये चिपळूणच्या रुद्र बांडागळेची प्रमुख भूमिका आहे.
संपूर्ण जगभरातून या फेस्टिव्हलमध्ये जवळपास आठशे शॉर्टफिल्म्स आल्या होत्या, यातून कोकणातल्या कलाकार, तंत्रज्ञांनी कोकणचा ठसा सातासमुद्रापार उमटविला आहे. ‘गोष्ट एका कावळ्याची’ या शॉर्टफिल्ममधून कोकणातील गोष्ट कोकणातल्या मुलांनी एका वेगळ्या पद्धतीने मांडली आहे. वाय. पी. प्रोडक्शन आणि सिनेरिया फिल्म प्रेझेंट ’गोष्ट एका कावळ्याची’ या शॉर्ट फिल्मची निर्मिती रोहित म्हात्रे, आरती पोटफोडे यांनी केली आहे. महेश कापरेकर यांची संकल्पना असलेल्या या शॉर्टफिल्मचे लेखन यतिन पवार यांनी तर दिग्दर्शन मंथन खांडके, मनोज भिसे यांनी केले आहे. छायांकन साईप्रसाद पिलणकर, सिद्धराज सावंत, संकलन स्वामी ओमन, निखिल पाडावे यांचे असून संगीत मिलिंद गोवेकर यांचे आहे.
यामध्ये कश्मिरा सावंत यांनी गायन केले असून तेजश्री पिलणकर हिची रंगभूषा, यामिनी रेडीज यांची वेशभूषा आहे. साई शिरसेकर, स्वरूप शिरसेकर यांची प्रकाश योजना तर सौरभ सावल यांनी ध्वनिमुद्रणाची बाजू सांभाळली आहे. प्रॉडक्शन टीममध्ये स्वप्नील गावडे, सुजित मिस्त्राr, प्रथमेश भाटकर, लाईन प्रोडक्शन म्हणून अजिंक्य कोल्हटकर, पोस्ट प्रॉडक्शन म्हणून सुबोध खामकर यांनी काम पाहिले आहे.
या शॉर्ट फिल्ममध्ये चिपळूणचा बालकलाकार रुद्र बांडागळे याची प्रमुख भूमिका असून स्मितल चव्हाण, मनोज भिसे, संचिता जोशी, वरद चव्हाण यांच्याही यामध्ये भूमिका आहेत. लवकरच वाय. पी. प्रॉडक्शनच्या यूटय़ूब पेजवर ही शॉर्टफिल्म प्रदर्शित केली जाणार आहे.
आठशे फिल्ममधून निवड चिपळूणच्या रूद्र बांडागळेची प्रमुख भुमिका