ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
चीनच्या चार कंपन्यांकडून होणाऱ्या उत्पादनांची आयात अमेरिकेने रोखली आहे. या चारही कंपन्या तेथील वाशिंक अल्पसंख्याकांची धरपकड करून त्यांच्याकडून सक्तीने काम करून घेत असल्याचे कारण अमेरिकेने दिले आहे. अमेरिकेने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे.
होमलँड सिक्युरिटी विभागाचे (डीएचएस) उपसचिव केन कुइकनेल्ली म्हणाले, चीनच्या झिंजियांग प्रांतातून कापूस, कपडे, संगणकाचे सुट्टे भाग तसेच बाल उत्पादने अमेरिका आयात करते. मात्र, या वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या चार कंपन्या तेथील वाशिंक अल्पसंख्याकांकडून सक्तीने काम करून घेतात. ही एक प्रकारची आधुनिक गुलामगिरी आहे. त्यामुळे या कंपन्यांकडून होणाऱ्या उत्पादनांची आयात अमेरिकेने थांबवली आहे.
गुलामगिरी पद्धतीने करून घेतले जाणारे उत्पादन चीन अमेरिकेला पाठवतो. त्याचा अमेरिकन व्यवसायावर परिणाम होतो, असेही कुइकनेल्ली यांनी म्हटले आहे. दरम्यान, अमेरिका आणि चीन यांच्यात नेहमीच व्यापार, कोरोना व्हायरस, मानवी हक्क आणि इतर मुद्द्यांवर संघर्ष सुरू आहे.