उत्पादनाचा वेग मंदावल्याने वितरणास उशीर
वृत्तसंस्था/ पुणे
जगभरातील देशांमध्ये चीपचा तुटवडा निर्माण झाल्याने ऑटो क्षेत्रातील कंपन्या सध्या अडचणीत सापडल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कंपन्यांच्या वाहन उत्पादन क्षमतेमध्ये कपात करण्यात आली आहे. याचाच परिणाम गेल्या उत्सवी काळामध्ये दिसून आला आहे. मागणीच्या तुलनेमध्ये वाहनांचा पुरवठा सदरच्या काळामध्ये पुरेशा प्रमाणात करण्यात कंपन्यांना अनेक अडचणी आल्या होत्या. बजाज ऑटोलाही सेमीकंडक्टरच्या अपुऱया पुरवठय़ाचा परिणाम भोगावा लागतो आहे. येणाऱया काळामध्ये कंपनीच्या निर्यातीवरही परिणाम होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
लोकप्रिय गाडय़ा मागणीत पण…
बजाज ऑटोच्या लोकप्रिय गाडय़ांना मोठी मागणी ग्राहकांनी नोंदवली पण कंपनीने पुरवठय़ाच्या अस्थिरतेमुळे अनेकांना थांबण्याचे आवाहन केले. याचाच अर्थ मागणी होती पण सेमीकंडक्टरच्या कारणास्तव कंपनीला मागणी पूर्ण करता आली नाही. पुण्यातील या कंपनीने आपल्या उत्पादनामध्ये जुलै-सप्टेंबरच्या कालावधीत निम्म्याने कपात केली होती.
पल्सर, केटीएम, हुस्कवर्णा व डोमिनरच्या 50 टक्के ग्राहकांवर सेमीकंडक्टरच्या अभावामुळे पाणी सोडावे लागले. सेमीकंडक्टरच्या पुरवठय़ानंतरच खऱया अर्थाने मागणीची पुर्तता शक्य होणार आहे.