भूतांच्या भीतीने मागील 9 वर्षांपासून रिकामी
जपानमध्ये पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाचे नाव ‘सोरी कोटेई’ आहे. पण भूतांच्या भीतीने मागील 9 वर्षांपासून कुठलाच पंतप्रधान येथे राहत नाही. या निवासस्थानाचा इतिहास अत्यंत हिंसक राहिला आहे. याचमुळे अफवा देखील पसरल्या आहेत. येथील हिंसेत मारले गेलेल्या लोकांच्या आत्मा त्त्भटकत असल्याचीही अफवा आहे.
योशिहिदे सुगा मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान झाले, पण 8 महिने उलटून देखील त्यांनी या भव्य निवासस्थानात राहण्याऐवजी डाइट सदस्यांच्या डोरमेट्रीमधील छोटय़ा क्वार्टरमध्ये राहत आहेत. सोरी कोटेई बंगला नॅशनल डाइट इमारतीला लागून असून तेथे 6 इमारती 25 हजार चौरस मीटरमध्ये फैलावलेल्या आहेत. यात पंतप्रधानांचे निवासस्थान ग्लास आणि स्टीलने तयार करण्यात आले आहे.
1932 मध्ये सैन्याच्या सत्तापालटाच्या प्रयत्नांदरम्यान तत्कालीन पंतप्रधानांना नौदल अधिकाऱयांच्या एका समुहाने गोळय़ा घातल्या होत्या. चार वर्षांनी पुन्हा सत्तापालटाचा प्रयत्न झाला, तेव्हाही पंतप्रधान ओकडा यांच्या नातलगासह चार जणांची हत्या करण्यात आली होती. तर 2001 ते 2006 दरम्यान पंतप्रधान राहिलेले जुनिचिरो कोईजुमी यांनी कथितरित्या शिंटो पुजाऱयाला भूत पळविण्यासाठी येथे पाचारण केले होते.
निवासस्थान रिकामी आहे, तरीही त्याच्या देखभालीकरता वर्षाला 11 कोटी रुपये खर्च होतात. सुगा यांना तेथे राहण्यास जाण्यास कुठली अडचण आहे हेच समजत नाही असे उद्गार विरोधी पक्ष नेते योशीहिको नोडा यांनी काढले आहेत. नोडा या निवासस्थानात राहणारे जपानचे अखेरच पंतप्रधान आहेत. ते डिसेंबर 2012 पर्यंत या पदावर होते.