बाणस्तारी माशेल येथील गावडे कुटूंबियावर आघात
प्रतिनिधी / फोंडा
वादळी वाऱयामुळे झालेल्या पडझडीत कोडावाडा बाणस्तारी येथील निलू गावडे यांच्या घरावर जांभळीचे झाड कोसळून दोघेजण गंभीर जखमी झाले. सखू निलू गावडे (55) व प्रियांका निलू गावडे (32) ही दोघी माता-लेक जखमी झाली आहे. दोघांनाही प्रकृती अस्वस्थतेमुळे बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. सदर घटना काल रविवार सकाळी 10.30 वा. सुमारास घडली.
जांभळीचे झाड मुळापासून उन्मळून पडल्याने घराच्या दर्शनी भागात पुर्ण जमिनदोस्त झाला. दर्शनी भागाच्या गॅलरीत असलेली माता-लेक गंभीर जखमी झाली. घराच्या आतमधील खोलीत असलेली वडील व दुसरी मुलगी सुदैवाने जखमेविना बचावली. सखू हीचा उजवा पाय फ्रक्चर झाला असून मुलगी प्रियांकाही गंभीर जखमी झाली आहे. सर्व वीजेची उपकरणे व किमती वस्तू बेचिराख झाल्या. सदर प्रसंगाने गावडे कुटूंबियावर आभाळ कोसळले आहे. सर्वत्र पडझडीच्या घटनेंमुळे अग्निशामक दलाचे मदतकार्यही वेळेवर पोहचू शकले नाही. शेजारी व ग्रामस्थांनी महत्वाचे मदतकार्य केले. जखमींना प्रथम बेतकी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता प्रकृती अस्वस्थतेमुळे बांबोळी येथील गेमेकॉत पाचारण करण्यात आले आहे.