सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यात पोलिसांनी चार ठिकाणी दारू अड्डयांवर छापे टाकले. त्यामध्ये चार जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हसवड पोलीस ठाणे हिंगणी ता. माण येथे गावच्या हद्दीत घराच्या आडोशाला दारु विक्री करणारे तातोबा लक्ष्मण सरतापे (वय 67) यांच्याकडून 900 रुपयांची 1 लीटरची देशी हातभट्टीची दारु हस्तगत केली. परळी येथे श्रीराम स्वीट मार्टच्या दुकानाच्या पाठीमागे आडोशास मनोज बबन राऊत (वय 38, रा. परळी) हा दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून सातारा तालुका पोलिसांनी 840 रुपयांच्या दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या.
तसेच सातारा शहर पोलिसांना पोलीस मुख्यालय ते पोवई नाका या रस्त्यावर टीपटॉप लॉन्ड्रीच्या लाकडी दरवाजाच्या आडोशाला दारू विक्री करणारा महादेव रजनीकांत शिंदे (वय 56, रा. मल्हारपेठ, सातारा) हा आढळून आला. त्याच्याकडून 5 हजार100 रुपयांच्या दारुच्या विदेशी बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वडूज येथे विनोद अशोक जाधव (वय 34, रा. वडूज) याच्याकडून 930 रुपयांची देशी दारुच्या टेंगो पंचच्या 15 बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.