भारताबरोबर व्यापार बोलणी करणार, स्वागताची जोरदार तयारी, सर्वत्र कडोकोट सुरक्षा व्यवस्था, मोटेरा सज्ज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन दिवसांचा भारत दौरा येत्या सोमवारपासून सुरू होत असून या दौऱयात त्यांच्यासमवेत त्यांच्या कन्या इव्हांका आणि जावई कुशनर हेसुद्धा येत आहेत. ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा असून अहमदाबाद आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात येत आहे.
अहमदाबादमधील मोटेरा मैदानावर त्यांच्यासाठी विशेष ‘नमस्ते ट्रम्प’ हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अहमदाबाद विमानतळापासून त्यांचा रोड शो ही होणार असून या कार्यक्रमाला लाखो लोकांची उपस्थिती असेल, असे गुजरात सरकारने स्पष्ट केले
आहे.
त्यांच्या या दौऱयात भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार होणार की नाही, याबद्दल मात्र साशंकता आहे. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनी गेले काही दिवस असा व्यापार करार करण्यासंबंधी बरेच प्रयत्न चालविले आहेत. तथापि, अमेरिकेतून भारतात आयात केल्या जाणाऱया काही महत्त्वाच्या वस्तूंवर भारत वाजवीपेक्षा जास्त कर आकारतो, असा अमेरिकेचा दावा आहे. या मुद्दय़ावर दोन्ही देशातील बोलणी अडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मोदी आपल्याला आवडतात
भारताने आतापर्यंत अमेरिकेकडून आयात केल्या जाणाऱया वस्तूंवर जास्त कर आकारून अमेरिकेचे नुकसान केले असले तरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला आवडतात, असे वक्तव्य ट्रम्प यांनी शुक्रवारी वॉशिंग्टन येथे केले. मोदींबरोबर व्यापारविषयक चर्चा करण्यास आपण उत्सुक आहोत. अमेरिका आणि भारतातील व्यापारविषयक चर्चेची गती धीमी असली तरी दिशा निश्चित आहे. दोन्ही देशांमध्ये दृढ आर्थिक संबंध असावेत, अशी माझी मनापासून इच्छा आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात विस्तृत व्यापार करार कदाचित अमेरिकेमधील अध्यक्षीय निवडणुकीनंतर होऊ शकतो. मात्र, दोन्ही देशांमध्ये संबंध अधिकाधिक जवळचे असतील याची दक्षता घेऊ, असे ट्रम्प यांनी स्पष्ट
केले.
मंत्रिपातळीवर बैठका
ट्रम्प यांच्या या दौऱयात भारताचे व्यापारमंत्री विनोद गोयल आणि अमेरिकेचे व्यापारमंत्री रॉबर्ट लिगथिजर यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱया होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही मंत्री एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यांनी दूरध्वनीवरून अनेकदा चर्चा केली असून व्यापार करारासंबंधीचे प्रारुप ठरविण्यासाठी प्रयत्न केले
आहेत.
ट्रम्प यांच्या याच दौऱयात व्यापार करार व्हावा, अशी भारताची इच्छा आहे. मात्र, ती फलद्रुप होईल की नाही? हे पूर्णतः डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच अवलंबून असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
द्विपक्षीय व्यापारात वाढ
गेल्या दहा वर्षांत भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापारात मोठी वाढ झाली आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये 150 अब्ज डॉलर्सचा व्यापार होत आहे. यात भारतातून होणारी निर्यात अधिक असून अमेरिकेहून केली जाणारी आयात कमी आहे. त्यामुळे या व्यापाराचा समतोल भारताच्या बाजूने आहे. त्यामुळेच ट्रम्प यांचा भारताने अधिक अमेरिकन वस्तू आयात कराव्यात, असा आग्रह आहे.