संशयित जाळय़ात: पोलिसांच्या विशेष कृती दलाकडून कसून चौकशी सुरू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांच्या निवासस्थानात एका अज्ञात व्यक्तीने कारसह घुसण्याचा प्रयत्न केल्याने सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली. याप्रकरणी एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या विशेष दलाने ताब्यात घेतले असून प्राथमिक चौकशीदरम्यान तो कर्नाटकमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच तपासादरम्यान आपल्या शरिरात एक चिप असून ती रिमोटद्वारे ऑपरेट केली जात असल्याची माहिती दिल्याने सुरक्षा अधिकारी अधिकच सतर्क झाले आहेत.
बुधवारी सकाळी डोवाल यांच्या निवासाबाहेर असलेली सुरक्षा व्यवस्था तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न एका कारचालकाने केला. त्यानंतर सुरक्षा दलाने त्याला तातडीने ताब्यात घेतले. सध्या दिल्ली पोलिसांचे विशेष पथक त्याची चौकशी करत आहे. सध्या ही व्यक्ती चुकून आली की त्यामागे काही षड्यंत्र आहे, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक चौकशीवेळी संशयिताने आपण कर्नाटकचा रहिवासी असून भाडय़ाने गाडी चालवत असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. मात्र, तो चुकून सदर परिसरात पोहोचला होता की यापेक्षा मोठा कट होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता स्थानिक पोलीस आणि विशेष कक्ष त्याची चौकशी करत आहेत. ही व्यक्ती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल टीमच्या ताब्यात आहे.
मनोरुग्ण असल्याची पोलिसांची माहिती
अज्ञात व्यक्तीने एनएसए अजित डोवाल यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला सुरक्षा दलांनी थांबवून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले. प्राथमिक तपासात ती व्यक्ती मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ आहे. ही व्यक्ती भाडय़ाने घेतलेली कार चालवत होती, असेही स्पष्ट करण्यात आले.