नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
दिल्लीहून लखनऊला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसला गाझियाबाद स्टेशनवर शनिवारी पहाटे आग लागली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6.45 वाजल्याच्या सुमारास ही रेल्वे गाझियाबाद रेल्वे स्टेशनवर दाखल झाली होती. तेव्हा या गाडीच्या पार्सल कोचमध्ये आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या आगीमुळे रेल्वेच्या इतर डब्यांना कोणतीही हानी झालेली नाही.
आग लागल्याची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. सकाळी सात वाजल्यादरम्यान अग्निशमन दलाला रेल्वेत आग लागल्याची सूचना मिळाली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवान करण्यात आल्या होत्या. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवशांनी आरडाओरडा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा जनशताब्दी एक्स्प्रेसमधून जवळपास 60 ते 70 प्रवासी प्रवास करत होते. त्यांना चकरपूर येथे सुरक्षितरित्या उतरवण्यात आलं असून बसने त्यांच्या गावी पाठवण्यात आले. आग कशामुळे लागली याची माहिती मिळालेली नाही.