प्रतिनिधी/ बेळगाव
बैलूर निष्कल मंटपाचे मठाधीश श्री निजगुणानंद स्वामीजींना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. यासंबंधी अज्ञातांनी एक पत्र पाठविले असून स्वामीजींसह 15 हून अधिक पुरोगामी कार्यकर्त्यांना मारण्याची धमकी या पत्रात देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर स्वामीजींच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
29 जानेवारीपासून तुमच्या ‘संहारा’साठी मुहूर्त ठरला आहे. अशी धमका अज्ञातांनी पाठविलल्या पत्रात देण्यात आली आहे. सध्या स्वामीजी गुलबर्गा जिल्हय़ातील जेवरगी येथे वास्तव्यास असून बेळगाव पोलिसांनी गुलबर्गा पोलिसांनाही यासंबंधीची माहिती दिली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यापूर्वीही फोनवरूनही स्वामीजींना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. शिमोगाहून त्या देण्यात आल्या होत्या. सध्या धमकी पत्राच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याचे पोलीस प्रमुखांनी सांगितले.
बजरंग दलाचे माजी प्रमुख महेंद्रकुमार, बेंगळूर येथील निडुमामीडी मठाचे वीरभद्र चन्नमल्ल स्वामीजी, चित्रपट अभिनेते प्रकाश राज, ज्ञानप्रकाश स्वामीजी, लेखक भगवान, पत्रकार दिनेश अमिनमट्टू, साहित्यिक चंद्रशेखर पाटील, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आदींसह 15 जणांच्या नावांचा या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.