पंढरपूर / प्रतिनिधी
पंढरपूर नगरपालिकेच्या तिसर्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी बाराच्या दरम्यान घडली आहे. जखमी अवस्थेत महिलेला दवाखान्यात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. श्रद्दा सुरेश शहापूरे (वय 35) जयसिंगपूर (ता.शिरुर) जि. कोल्हापूर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत शहर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी 11.30 वाजता एक महिला सकाळी 12 वा. च्या सुमारास पंढरपूर नगरपालिकेत आली. रविवारी शासकीय कामकाज बंद असल्याने कर्मचारी आलेले नव्हते. मात्र, जे इतर कर्मचारी आले होते. ते महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात गुंतले होते. इतक्यात सदर महिला कर्मचार्यांची नजर चूकवून तिसर्या मजल्यावर गेली. तेथून अचानक खाली उडी मारली. तिसर्या मजल्यावरुन उडी मारल्याने पार्किंग जागेत पडल्याने महिला गंभीर जखमी झाली होती.
सदर महिला निपचत पडल्याने येथील कर्मचार्यांनी आवाज दिला मात्र ती उठली नाही किंवा कोणतीही हालचाल केली नाही. तेव्हा नगरपालिका कर्मचार्यांनी जवळ जावून पाहिले असता रक्त पडल्याचे दिसून आले. सदर महिला विव्हळत होती. या घटनेची माहिती येथील कर्मचार्याने तात्काळ वरिष्ठांना दिली. तसेच अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली. पोलीसांना माहिती दिल्याने पोलीसही तात्काळ जागेवर आले. पोलीसांनी महिलेची पर्स तपासणी केली असता त्यामध्ये एसटी बसचे सांगली ते पंढरपूर असे तिकीट मिळाले आहे. दरम्यान, जखमी अवस्थेत महिलेला उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे दाखल केले. मात्र, दुपारी एक वाजता सदर महिला मृत्यू पावली आहे. या घटनेची माहिती पोलीसांनी महिलेच्या कुटुंबियांना दिली. कुटुंबियांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आहे.पोलीसांनी या घटनेची नोंद अकस्मात मयत अशी केली आहे. अधिक तपास पो.हे.कॉ. देशपांडे हे करीत आहेत.