वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाटय़ाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला असून ही बैठक येत्या गुरुवारी, अर्थात 13 जानेवारीला दुपारी साडेचारला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे.
या बैठकीत कोरोना परिस्थितीची समीक्षा केली जाईल. तसेच संक्रमण रोखण्यासाठी विविध राज्यांनी केलेल्या उपायांचा आढावाही घेतला जाईल. गेल्या रविवारी पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारच्या अधिकाऱयांसमवेत कोरोना आढावा बैठक घेतली होती. त्याच बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांशी बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्रीही उपस्थित असतील.
गुरुवारच्या बैठकीला सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्रत्येक मुख्यमंत्री त्यांच्या राज्यातील स्थिती कथन करणार असून पंतप्रधान मोदी केंद्र सरकारची सज्जता आणि इतर महत्वाची माहिती देतील. नव्या सूचनांच्या साधकबाधकतेवरही बैठकीत चर्चा केली जाईल.
अधिकतर रुग्ण ओमिक्रॉनचे
देशात आढळणाऱया नव्या रुग्णांमध्ये आता जास्तीत जास्त रुग्ण ओमिक्रॉन या कोरानाच्या नव्या रुपाचे असल्याचे स्पष्ट होत आहे. जानेवारीच्या अखेरीपर्यंत रुग्णसंख्या अधिक प्रमाणात वाढेल. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत हा उद्रेक ओसरु लागेल असेही अनुमान व्यक्त केले जाते. ओमिक्रॉन हा विषाणू झपाटय़ाने पसरणारा असला तरी, तो जास्त प्रमाणात जीवीत हानी करणारा नाही, असे सांगण्यात येते. तरी लोकांनी मास्क आणि सॅनिटायझर यांच्या जास्तीत जास्त उपयोग करावा. गर्दीत जाणे टाळावे आणि शक्य तेवढे सामाजिक अंतर पाळावे. एकाजागी जास्त लोक असलेल्या जागा टाळाव्यात अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
नवे 1.68 लाख कोरोना रुग्ण
सोमवार ते मंगळवार या चोवीस तासांमध्ये देशभरात नव्या 1 लाख 68 हजार 063 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ही संख्या एक दिवसापूर्वीच्या संख्येपेक्षा 6.5 टक्क्यांनी कमी आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरात 277 लोकांचा मृत्यू कोरोनाने झाला. अशा प्रकारे आतापर्यंत कोरोनाने मृत झालेल्यांची संख्या आता 4,48,213 इतकी झाली. महाराष्ट्र आजही रुग्णसंख्येत आघाडीवर असून या राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये 33,470 नवे रुग्ण आढळले. त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये 19,286, तामिळनाडूत 13,990 आणि कर्नाटकात 11,698 नवे रुग्ण गेल्या चोवीस तासांमध्ये आढळून आले आहेत.