प्रतिनिधी /वार्ताहर / संकेश्वर / हुक्केरी
राजकारणाची पहिली पायरी म्हणून ग्राम पंचायतीकडे पाहिले जाते. या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली असून मंगळवार दि. 22 रोजी जिल्हय़ातील काही तालुक्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोगाने पूर्ण ती तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये बेळगाव, खानापूर, हुक्केरी, बैलहोंगल, कित्तूर, गोकाक, मुडलगी या सात तालुक्मयातील ग्राम पंचायतीची निवडणूक होत आहे. दरम्यान, दुसऱया टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 30 डिसेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
ग्राम पंचायत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून हुक्केरी तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गावागावात प्रचारांच्या रणधुमाळीने इर्षेचे राजकारण पेटले आहे. सोमवारी 21 रोजी मतदान प्रक्रियेतील सर्वच कर्मचाऱयांनी मतदान बूथमध्ये दाखल होऊन मतदानाची प्रक्रिया सज्ज केली आहे. आज 22 रोजी सर्वच मतदारांचे भविष्य मतदान पेटीत बंद होणार असून बंद पेटीतून मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.
सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून तालुक्याच्या सर्व भागातून शिक्षक, पोलीस कर्मचारी, ग्राम पंचायतीचे कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी, आशा कार्यकर्त्यांसह महसूल विभागातील कर्मचारी दाखल होत होते. तहसीलदार अशोक गुराणी आपल्या सहकाऱयांच्या मदतीने तालुक्यात एकूण 369 मतदान बुथवर कर्मचाऱयांचे नेमणूक पथक बसने रवाना करीत होते.
साहित्य सुपूर्द
प्रत्येक मतदान केंद्रासाठी लागणारे बॅलेटपेपर, मतदान पेटीसह अन्य साहित्याचे पार्सल केंद्रप्रमुखांना सुपूर्द करीत दिलेले साहित्य यादीनुसार आहे का याची शहानिशा केली जात होती. कर्मचाऱयांनी मतदानाचे सर्व साहित्य एकत्र करून आपल्याला मिळालेल्या मतदान केंद्राकडे कूच चालविली होती. दरम्यान हुक्केरी तालुका निवडणूक निरीक्षक तथा बुडाचे आयुक्त प्रितम नसलापूरे यांनी भेट देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. कोणत्याही परिस्थितीत मतदान प्रक्रियेचे काम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱयांनी प्रयत्न करावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
मतदान केंद्रे सज्ज
हुक्केरी तालुक्यात एकूण 52 ग्राम पंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. यापैकी बेल्लद बागेवाडी ग्राम पंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे 51 ग्राम पंचायतीसाठी निवडणुका होत आहेत. यासाठी एकूण 369 मतदान केंद्रे असून या सर्व केंद्रासाठी 1,600 कर्मचाऱयांची नेमणूक केली आहे. या व्यतिरिक्त पोलीस व आशा कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे. तालुक्यात 134 मतदान केंद्रे संवेदनशील तर 95 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. या मतदान केंद्रावर खास सुरक्षा व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे. मंगळवारी 2,63,466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर कर्मचारी व मतदानासाठी येणाऱया मतदारांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. कर्मचाऱयांना जेवण व राहण्याची सोय केली आहे. याशिवाय ऐनवेळी निर्माण होणाऱया समस्येसाठी भरारी पथके तयार ठेवली आहेत. त्या पथकांकडून समस्या सोडवल्या जाणार आहेत, अशी माहिती तहसीलदार अशोक गुराणी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गोकाक तालुक्यात 544 जागांसाठी मतदान
घटप्रभा : गोकाक तालुक्यातील 32 ग्राम पंचायतींसाठी आज निवडणूक होणार आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रकाश होळेप्पागोळ यांनी दिली. ते म्हणाले, एकूण 620 जागांपैकी 61 जागांवर बिनविरोध निवडी झाल्या आहेत. तर 4 ठिकाणी पात्र उमेदवारांनी अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे 544 जागांसाठी ही निवडणूक होणार असून यासाठी एकूण 1,90,155 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चोख बंदोबस्ताचे नियोजन
पहिल्या टप्प्यातील या निवडणुकीसाठी एकूण 1779 मतदान केंदे आहेत. त्यामधील 234 मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत. त्यामुळे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. एक पोलीस प्रमुख, एक अतिरिक्त पोलीस प्रमुख, सात पोलीस उपअधीक्षक, 13 मंडल पोलीस निरीक्षक, 64 पोलीस उपनिरीक्षक, 132 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 2 हजार 710 हवालदार व पोलीस, 555 होमगार्ड असा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. याचबरोबर सशस्त्र दलाच्या 18 व राज्य राखीव दलाच्या सहा तुकडय़ा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.