वार्ताहर /पालये
पालये येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्मरणिका 2022 चा प्रकाशन सोहळा श्री भूमिका वेताळ मंदिराच्या सभामंडपात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून ऍड. सिद्धी जित आरोलकर, सरपंच रंजना राजन परब, श्री भूमिका वेताळ देवस्थान समितीचे अध्यक्ष एकनाथ तुकाराम परब, पंचायतसदस्य शिवा तिळवे, यंदाच्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष जयराम श्रीकृष्णा परब, उपाध्यक्ष तथा पंचायतसदस्य संदीप मनोहर न्हानजी, सचिव तथा पंचायतसदस्य सागर चंद्रकांत तिळवे, उपसचिव शांती किशोर तिळवे, खजिनदार सतीश सद्गुरु तिळवे, उपखजिनदार अशोक वासू गवंडी, रमेश ऊर्फ चंद्रकांत तिळवे, योगेश बाबू पालयेकर, ‘तरुण भारत’चे उपसंपादक राजेश परब तसेच समितीचे अन्य पदाधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
प्रारंभी सागर तिळवे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विष्णू श्रीकृष्णा परब यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्पे देऊन स्वागत केले. लॉटरीसारख्या प्रकाराला थारा न देता केवळ गणेशभक्त देत असलेल्या देणग्यांच्या आधारे पालये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे चालू असलेले कार्य खरोखरच अभिनंदनीय व कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन ऍड. सिद्धी जित आरोलकर यांनी केले. मंडळाला तसेच पंचायत मंडळाला आरोलक कुटुंबियांतर्फे नेहमी सहकार्य लाभेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
2001 मध्ये सुरू करण्यात आलेला पालये सार्वजनिक गणेशोत्सव यंदा 22 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणाऱयांचा नामोल्लेख करून राजेश परब यांनी आपल्या भाषणात त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. स्मरणिकेमध्ये केवळ जाहिरातबाजीला स्थान न देता त्यात वैचारिक खाद्यही पुरविण्यात आल्याने मंडळाच्या पदाधिकाऱयांना त्यांनी धन्यवाद दिले. सरपंच रंजना परब यांनी आपल्या भाषणात गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तसेच पदाधिकाऱयांचे अभिनंदन केले. मंडळाचे अध्यक्ष जयराम श्रीकृष्णा परब यांनी आभार मानले.