क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पधेंत वास्को स्पोर्ट्स क्लबने पिछाडीवरून कुडचडेच्या गार्डीयन एँजल स्पोर्ट्स क्लबला 2-1 गोलानी पराभूत केले. जीएफएच्या धुळेर मैदानावर खेळविण्यात आलेल्या या निकालाने वास्को क्लबला 3 गुण प्राप्त झाले. फ्रान्सिस्को फर्नांडिस व चिराग म्हार्दोळकर यांनी वास्को क्लबसाठी गोल केले तर गार्डीयन एँजल क्लबचा एकमेव गोल गोपी गाडने केला.
गार्डीयन एँजल क्लबने सामन्याची सुरूवात धडाक्यात करताना तिसऱयाच मिनिटाला गोल करून आघाडी घेतली. त्यांच्या गोपी गाडने उजव्या बगलेतून हाणलेला फटक्यावर प्रतिस्पर्धी संघाचा गोरलक्षक लुईस बार्रेटो हतबल ठरला. वास्कोने नंतर प्रतिस्पर्धी संघावर काही आक्रमक चाली रचल्या. तिसाव्या मिनिटाला वास्कोने बरोबरीचा गोल केला. डाव्या बगलेतून बर्सल वियेगसने केलेल्या क्रॉसवर चिराग म्हार्दोळकरने गार्डीयन एँजल क्लबचा गोलरक्षक ऑस्वीन रॉड्रिग्सला भेदले आणि बरोबरी साधली.
दुसऱया सत्रात गार्डीयन एँजल स्पोर्ट्स क्लबच्या साहिल भोकारे आणि फॅडरीच फर्नांडिस यांचे गोल करण्याचे यत्न वास्को क्लबचा अनुभवी गोलरक्षक लुईस बार्रेटोने उधळून लावले. दुसऱया सत्रात वास्को क्लबच्या कॅविन लोबो आणि कुलदीप कुमारचे गोल करण्याचे यत्न हुकले. शेवटी एका काऊंटर ऍटेकवर फ्रान्सिस्को फर्नांडिसने गार्डीयन एँजलच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत वास्को क्लबचा विजयी गोल केला. शेवटच्या क्षणी गार्डीयन एँजलच्या निकोलस रॉड्रिग्स आणि वास्को क्लबच्या जोशुवा डिसिल्वाचे गोल करण्याचे यत्न हुकले. आज गुरूवारी धुळेर स्टेडियमवर साळगावकर फुटबॉल क्लब व सेसा फुटबॉल अकादमु यांच्यात लढत होईल.