देवरुख-कांजिवरा येथील घटना, पाचलाखांचाऐवजलंपास,चौघेफरार
वार्ताहर/ देवरुख
देवरुख-कांजिवरा येथील नुरुल होदा मशहुरअली सिद्दीकी यांच्या घरी शुक्रवारी पहाटे 3 वाजता चार इसमांनी घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवत दागिने व रोख रक्कम असा सुमारे 5 लाख 38 हजार रुपयांचा ऐवज लुटला. यानंतर चोरटे तेथून फरार झाले. या फिल्मीस्टाईल घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, कांजिवरा येथील नुरुल सिद्दीकी यांच्या घरी शुक्रवारी पहाटे 3 वाजता घराच्या मागील दरवाजाची कडी उचकटून आरोपींनी घरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी नुरुल यांना लाथा-बुक्क्याने मारहाण केली. त्यांच्या पत्नीला पिस्तुलचा धाक दाखवून बेडरुममधील कपाटे स्पूडायव्हरने उघडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल हॅण्डसेटची चोरी केली. त्यानंतर नुरुल व त्यांचा भाचा असादउल्ला या दोघांच्या तोंडाला प्लास्टिक गुंडाळून त्या सर्वांचे हात नायलॉन दोरीने बांधले.
यावेळी फिर्यादी नुरुल यांना अनोळखी चार इसमांनी 2 दिवसात 5 कोटी रुपये पाहिजेत नाहीतर, तुला व तुझ्या मुलाला ठार करु, अशी धमकी देवून ते निघून गेले. सिद्दीकी यांच्या फिर्यादीवरुन देवरुख पोलिसांनी 186/2021, भा.दं.वि.कलम 394, 342, 384, भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हय़ाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप करत आहेत. या गुन्हय़ाच्या तपासासाठी रत्नागिरी येथून श्वानपथक व ठसेतज्ञही दाखल झाले होते. यावेळी लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश कानडे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा उपस्थित होते. देवरुख कांजिवरासारख्या वर्दळीच्या भागात असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.