प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूरच्या वैद्यकीय जगतात गोरगरीबांचा डॉक्टर म्हणून लौकिक संपादन केलेले प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ आणि ख्यातकिर्त बासरी वादक, बॅडमिंटनपटू डॉ. अभिजित विनायक देवधर वय 50, रा. मुक्त सैनिक वसाहत यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. गेले आठ दिवस त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन गुरूवारी 23 डिसेंबर सकाळी 8 वाजता आहे. त्यांच्या पश्चात वडील भारतीय वायू सेनेतील निवृत्त अधिकारी विनायक देवधर, पत्नी डॉ. गायत्री, मुलगा ज्योर्तिजय, भाऊ चारूहास, भावजय, पुतणे असा परिवार आहे.
माईसाहेब बावडेकर, विद्यापीठ हायस्कूल आणि विवेकानंद कॉलेजमध्ये शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या डॉ. देवधर यांनी डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस केले. सोलापूरच्या वाडिया कॉलेजमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. सीपीआरमध्ये अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून त्यांनी आठ वर्षे सेवा बजावली. साईक्स एक्सक्टेंशन, टाकाळा (माळी कॉलनी) येथे त्यांचे हॉस्पिटल होते. दोन वर्षांपूर्वी मुक्त सैनिक वसाहत येथे भव्य देवधर हॉस्पिटलची उभारणी केली होती. वैद्यकीय व्यवसायातील नीतीमूल्ये सांभाळत रूग्ण सेवा करणारे डॉ. देवधर ख्यातकिर्त बासरी वादकही होते. सांगितिक जगतात त्यांचे मोठे नाव होते. त्यांनी बासरी वादनाचे असंख्य कार्यक्रम केले होते. त्यांनी कंपोझ केलेल्या दहा गझलही गाजल्या होत्या. उत्कृष्ट बॅडमिंटनपटू असणाऱया डॉ. देवधर यांनी विद्यापीठ हायस्कूलकडून खेळताना शालेय स्पर्धा गाजविल्या होत्या.
सामाजिक बांधलकी जपणारा डॉक्टर
डॉ. देवधर कोल्हापुरातील सर्व ऑक्रेस्ट्राच्या कलाकारांवर मोफत वैद्यकीय उपचार करत असत. गोरगरीबांना मोफत उपचार करणारा डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती. रविराई फौंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब मुलांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपनही केले होते.
सीपीआरमध्ये लोकप्रिय
2000 ते 2008 या काळात डॉ. देवधर यांनी सीपीआरमध्ये अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे पहिले अस्थिरोगतज्ञ ठरले. रूग्णाला धीर देत उपचार करणारा, सामाजिक बांधिलकी जपणाऱया डॉ. देवधर यांच्या अकाली एक्झीटने हळहळ व्यक्त होत आहे.