प्रतिनिधी / फोंडा
मडगांव येथील सराफी स्वप्निल वाळके यांच्या खूनाचा छडा लावण्यात शहरातील सीसीटिव्ही कॅमेऱय़ांनी महत्वाची कामगिरी बजावली. आजच्या हायटेक जमान्यात सीसीटीव्ही यंत्रणा राज्यातील सर्व प्रमुख शहरात असणे अनिवार्य आहे. अशीच परिस्थिती राज्यातील प्रत्येक शहरात खरीच आहे काय? याचा आढावा घेतल्यास फोंडा शहरातील वाहतूक आणि विविध गैरकृत्यांवर नजर ठेवण्यासाठी नाक्यांवर कार्यान्वित केलेले सीसीटीव्ही कॅमेरे सध्या शोभेच्या वस्तू बनून राहिल्या आहेत. तब्बल 22 कॅमेरांपैकी एकही कॅमेरा कार्यरत नसून लाखो रुपये खर्चून शहरातील सुरक्षेसाठी पुरविण्यात आलेली ही आवश्यक यंत्रणा कुचकामी ठरलेली आहे. त्यामुळे एखादी खूनप्रकरणी व इतर गुन्हय़ाचा माग घेताना पोलिसांवर बिकट परिस्थिती ओढावण्याची शक्यता आहे.
फोंडा शहरातील प्रत्येक सराफी दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. येथे ग्राहक महागडे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करून दुकानातून बाहेर पडतात, मात्र शहर परिसरात एकही सीसीटीव्ही नसल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार कुणी करावा असा प्रतिसवाल सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे. महिलांच्या गळयातील सोनसाखळया हिसकावण्याच्या अनेक घटना फोंडयात घडलेल्या आहेत. परंतू पोलीस दरबारी अशा घटनांची नोंद नाही. शहरातील नादुरूस्त कॅमेरे सुधारण्यासाठी पोलिस कोणतीच पावले उचलताना दिसत नाही.
फेंडा पालीकेचे नगराध्यक्ष दरवर्षी बदलतात
परंतू सीसीटीव्ही कॅमेरे बदलत नाही!
दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी 31 डिसेंबर 2015 रोजी खासदार निधीतून एमपीएलईडी योजनेअंतर्गत फोंडा शहरातील वाहतूक व्यवस्था, चोऱया व इतर गुन्हेंगारी कृत्यांवर पोलिसांना नजर ठेवता येईल, यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध करुन दिली होती. मागील कित्येक वर्षापासून सर्व कॅमेरे नादुरुस्त अवस्थेत असून सर्व कॅमेऱयाचे मॉनिटरींग युनिटही फोंडा पोलिस स्थानकात धुळ खात आहे. फोंडा पालीकेवर नव-नवीन युवा चेहरे निवडून देण्यात येथील जनतेला बलतेच स्वारस्य त्यानंतर पालीकेलाही दरवर्षी नवीन नगराध्यक्ष बदलण्याचे वेध लागते. परंतू निवडून आल्यानंतर एकही लोकप्रतिनिधीने शहरात नागरिकांना निर्धास्तपणे फिरता यावे, यासाठी प्रभावी उपाययोजना केलेली दिसत नाही. सीसीटीव्ही कॅमेरे बदलण्यासाठी कधी पुढाकार घेतला नसल्याची खंत काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱयाची मोक्याची ठिकाणी गरज
फेंडा सीसीटीव्ही कॅमेरे फोंडा शहरात कार्यान्वित करणे अंत्यत गरजेचे आहे. तसेच त्याची डागडुजीची जबाबदारी पालीकेकडे सोपवावी. सदर यंत्रणा कार्यान्वित करताना भविष्यात कॅमेऱय़ाच्या डागडुजीची काळजी कोणी घ्यावी याबाबत निर्णय घेणे जरूग्नरीचे असून कॅमेऱयांची झुमिंग क्षमता वाढविणे आवश्यक आहे. मोक्याची ठिकाणी होणारी वाहतूक केंडीतून वाट काढण्यासाठी वाहने दुसऱया बाजूने वळविण्यात यंत्रणा उपयुक्त ठरत होती. चोरी, दरोडय़ाच्या वाढत्या घटनामुळे यंत्रणेची गरज भासू लागली आहे.
बागायतदार येथे सीसीटिव्ही कार्यान्वित करावा
फोंडा शहरातील गजबजलेले ठिकाण म्हणजे गोवा बागायतदार बाजार! याठिकाणी आपल्या मालाची काळजी घेण्यासाठी अंतर्गत अनेक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहे मात्र बहुमुल्य ग्राहकांची काळजी घेण्यासाठी एकही कॅमेरो प्रवेशद्वारावर नसल्याचे आढळून आले आहे. मागील वेळी बागायतदाराच्या समोर घडलेल्या घटनेत वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावल्याचे प्रकार टिपत नसल्यामुळे आश्चर्य व्य़क्त करण्यात आले होते. त्यामुळे अशा घटनावर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे फोंडा पालीकेतर्फे सीसीटिव्ही कॅमेरा बसवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱयाबाबत फोंडय़ातील नागरिकांची नाराजी
फोंडा शहरातील पोलीसांच्या कृपादृष्टीने चालणारे काहि गैरप्रकार कॅमेरात बंदिस्त होत असल्यामुळेही कॅमेरे नादुरूस्त करण्यात आल्याचे काहि ग्राहकांनी प्रतिक्रिया दिली. वाहतूक अधिकारी, पोलीस, पालीका मंडळ व लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने शहरातील मोक्याच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येणे गरजेचे आहे. ते बसवताना कॅमेरातून टिपण्यात येणारी छबी ओळखण्या इतकी स्पष्ट दिसावी अशी सोय करायला हवी. शहरातील विक्रेत्याना मात्र परवाना घेण्यापुरते कॅमेऱयाची सक्ती करण्यात येते त्यानंतर देखरेखेसाठी असलेल्य़ा कॅमेऱयाची डागडूजी करण्यात येत नसल्याने शहरात खाजगी आस्थापनातही चोरीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.
खबरदारीच्या उपाय म्हणून 24 बाय 7 पोलिस तैनात
मडगांव ज्युवेलर्स खूनाच्या पार्श्वभूमीवर फोंडय़ाचे पोलीस निरीक्षक हरिष मडकईकर यांनी तातडीची बैठक आपल्या बिट पोलिस व उपनिरीक्षकांशी घेतली. खबरादारीची उपाययोजना म्हणून (24 बाय 7) शहरात नाकानाक्यावर पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच शहरातील सराफी दुकानदारांशी चर्चा करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱय़ाची सर्व्हीसिंग, डेड वॉल प्रोटेक्शन यावर उपाययोजना सुचविण्यात आल्याचे निरीक्षक मडकईकर यांनी सांगितले.
सोनसाखळय़ा हिसकावल्यानंतर पिडीत महिलांनी पोलिस स्थानक गाठतात, मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्याऐवजी तक्रारदारांनाच उलटसुलट पश्न विचारून जेरीस आणण्याचे प्रकार सुरू असतात. आजारी सीसीटीव्ही कॅमेरे बदलून त्याजागी नवीन कॅमेरे बसविण्यात यावी अशी जोरदार मागणी गेली कित्येक वर्षे होत आहे. फोंडय़ाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अपुर्व उर्फ विश्वनाथ दळवी यांनी याकामी तत्परता दाखवावी अशी मागणी होत आहे.