वृत्तसंस्था/ कँडी
यजमान श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी अनिर्णित राहिली. या सामन्यात द्विशतक झळकविणारा लंकेचा कर्णधार दिमूथ करूणारत्नेला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले.
या कसोटीत पाच दिवसांच्या कालावधीत दोन्ही संघांकडून सुमारे 1300 धावा जमविल्या गेल्याने गोलंदाजी निष्प्रभ ठरल्याचे दिसले. बांगलादेशने आपला पहिला डाव 7 बाद 541 धवांवर घोषित केल्यावर लंकेने आपला पहिला डाव 8 बाद 648 धावांवर घोषित करून 107 धावांची आघाडी मिळविली. बांगलादेशने खेळाच्या शेवटच्या दिवशी दुसऱया डावात 2 बाद 100 धावा जमविल्या.
लंकेने 3 बाद 512 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली. कर्णधार करूणारत्नेने 437 चेंडूत 25 चौकारांसह 244 धावा तर धनंजय डिसिल्वाने 22 चौकारांसह 291 चेंडूत 166 धावा झळकविल्या. पी. डिसिल्वाने 3 चौकारांसह 43, डिक्वेलाने 3 चौकारांसह 31, निशांकाने 1 चौकारांसह 12, लकमलने 1 षटकारांसह नाबाद 22 धावा जमविल्या. लंकेने 179 षटकांत 8 बाद 648 धावांवर डावाची घोषणा केली. बांगलादेशतर्फे टी. अहमदने 112 धावांत 3, टी इस्लामने 163 धावांत 2, हुसेन आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. लंकेच्या करूणारत्ने आणि धनंजय डिसिल्वा यांनी चौथ्या गडय़ासाठी 345 धावांची भागिदारी केली.
बांगलादेशने दुसऱया डावात 33 षटकांत 2 बाद 100 धावा जमविल्या. सलामीचा तमीम इक्बाल 3 षटकार आणि 10 चौकारांसह 74 तर कर्णधार मोमिनूल हक 23 धावांवर नाबाद राहिले. सइद हासन एका धावेवर बाद झाला. नजमूल हुसेनला खाते उघडता आले नाही. लंकेतर्फे लकमलने 21 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक- बांगलादेश प. डाव 7 बाद 541 डाव घोषित, लंका प. डाव 8 बाद 648 डाव घोषित (करूणारत्ने 244, धनंजय डिसिल्वा 166, थिरिमने 58, ओ फर्नांडो 20, मॅथ्यूज 25, निशांका 12, डिक्वेला 31, पी. डिसिल्वा 43, लकमल नाबाद 22, टी. अहमद 3-112, टी. इस्लाम 2-163, हुसेन, मेहदी हासन प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश दु. डाव 33 षटकांत 2 बाद 100 (तमीम इक्बाल नाबाद 74, मोमिनूल हक नाबाद 23, लकमल 2-21).