योगगुरु विरोधात खटला चालविण्याची मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) योगगुरु बाबा रामदव यांच्यावर अलोपॅथी उपचारपद्धतीच्या विरोधात असत्य पसरविल्याचा आरोप केला आहे. डॉक्टरांच्या संस्थेने रामदेव यांच्यावर खटला चालविण्याची मागणी देखील केली आहे. सोशल मीडियावर रामदेव यांची एक चित्रफित व्हायरल होत असून यात ते अलोपॅथीला बेकार आणि दिवाळखोर विज्ञान ठरवत असल्याचे आयएमएने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
यापूर्वी कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या स्वतःच्या औषधाच्या सादरीकरणावेळी देखील रामदेव यांनी डॉक्टरांना मारेकरी संबोधिले होते. या कार्यक्रमात आरोग्यमंत्रीही उपस्थित होते. बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी बालकृष्ण आजारी पडल्यावर अलोपॅथीचा उपचार घेत असल्याचे सर्व जाणतात. तरीही स्वतःचे अवैध औषध विकण्यासाठी ते सातत्याने अलोपॅथीबद्दल भ्रम तयार करत आहेत. यातून एका मोठय़ा लोकसंख्येवर प्रभाव पडत असल्याचा आरोप आयएमएने केला आहे.
रेमडेसिविर, फॅविफ्ल्यू आणि डीजीसीआयकडून मान्यताप्राप्त अन्य औषधांमुळे लाखो लोकांचा मृत्यू ओढवल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. त्यांनी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय) आणि आरोग्य मंत्र्यांच्या प्रतिष्ठेला आव्हान दिले आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारात रेमडेसिविरच्या वापराची मंजुरी सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशनने (सीडीएससीओ) मागील वर्षी जून महिन्यात दिली होती. यासंबंधी अफवा पसरविणे आणि लाखो लोकांचा जीव धोक्यात आणण्यासाठी बाबा रामदेव यांच्यावर खटला चालविला जावा. रामदेव यांनी फेविपिराविरला तापावरील औषध ठरविले होते. यातून वैद्यकीय शास्त्रासंबंधीचे त्यांचे ज्ञान किती तुटपुंजे आहे हे दिसून येत असल्याचे आयएमएने पत्रात म्हटले आहे.
कोरोना महामारीमुळे देश सध्या आरोग्य आणीबाणीला तोंड देत आहे. संक्रमणामुळे आतापर्यंत लाखो लोकांनी जीव गमावला आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी सरकारसोबत मिळून ही महामारी रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. जीवघेण्या विषाणूच्या विरोधात डॉक्टर लढाई लढत आहेत. कोरोनाबाधितांना वाचविताना हजारो डॉक्टर्स संक्रमित झाले आहेत. यातील 1200 डॉक्टरांना जीव गमवावा लागल्याचे आयएमएने पत्रात नमूद केले आहे.