बुंदेस्लिगानंतर पटकावला जर्मन चषक, लिव्हरकुसेनवर 4-2 गोल्सनी मात, लेवान्डोवस्कीचे दोन गोल
वृत्तसंस्था/ बर्लिन
बायर्न म्युनिचने या मोसमात दुहेरी मुकुट साधताना जर्मन चषकही पटकावला. शनिवारी झालेल्या सामन्यात बायर्न म्युनिचने बायर लिव्हरकुसेनचा 4-2 असा पराभव करून 20 व्या वेळी या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. बायर्नच्या रॉबर्ट लेवान्डोवस्कीने या मोसमातील 50 गोलांचा टप्पा पार केला. या सामन्यातही प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला नव्हता.
बुंदेस्लिगाचे जेतेपद मिळविलेल्या बायर्नने बर्लिनच्या ऑलिम्पिक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पूर्ण वर्चस्व राखले होते. डेव्हिड अलाबाने संघाला फ्री किकवर लवकर आघाडी मिळवून दिल्यानंतर सर्जी नॅब्रायने पूर्वार्धातच दुसरा गोल नोंदवला. उत्तरार्धात लेवान्डोवस्कीने त्यात आणखी दोन गोलांची भर घालून जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. त्याचे या मोसमात आता 51 गोल झाले आहेत. लिव्हरकुसेनच्या स्वेन बेन्डरने हेडरवर पहिला गोल केल्यानंतर वाढीव वेळेत पेनल्टीवर काइ हॅवर्ट्झने त्यांचा दुसरा गोल नोंदवला. पण पराभव टाळण्यास ते पुरेसे ठरले नाहीत. ‘उत्तरार्धात आम्ही सरस आहोत हे दाखवून दिले आणि जेतेपद पटकावण्यास आम्ही उत्सुक आहोत, हेही दाखवून दिले,’ असे लेवान्डोवस्की म्हणाला.
मागील शनिवारी बायर्नने सलग आठव्या वर्षी बुंदेस्लिगाचे जेतेपद पटकावले होते. कोरोना व्हायरसच्या ब्रेकनंतर मे महिन्याच्या मध्यावर फुटबॉलला पुन्हा सुरुवात केल्यानंतर झालेले अकराही सामने बायर्नने जिंकले आहेत. त्यांना आता तिहेरी मुकुट साधण्याची संधी असून पुढील महिन्यात चॅम्पियन्स लीगची अंतिम लढत लिस्बनमध्ये होणार आहे. या क्लबच्या इतिहासात दुहेरी मुकुट साधण्याची बायर्नची ही 13 वी वेळ आहे. मागील आठवडय़ातच लेवान्डोवस्कीने पाचव्यांदा टॉप स्कोअररचा बहुमान मिळविला असून जर्मन कपमध्ये त्याने 6 गोल केले आहेत. लीगमध्ये त्याने या मोसमात 34 आणि चॅम्पियन्स लीगमध्ये आतापर्यंत 11 गोल नोंदवले आहेत. लिव्हरकुसेनची मात्र या स्पर्धेत पराभवाची हॅट्ट्रिक झाली असून यापूर्वी 2002 व 2009 मध्येही त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
सामन्याच्या 16 व्या मिनिटाला लेवान्डोवस्कीला डिफेंडर एडमंड टॅप्सोबाने फाऊल केल्यानंतर मिळालेल्या फ्री किकवर ऍलाबाने गोल नोंदवून बायर्नला आघाडीवर नेले. आठ मिनिटानंतर जोशुआ किमिचने पुरविलेल्या पासवर ताबा घेत नॅब्रायने लिव्हरकुसेनचा गोलरक्षक लुकास ऱहॅडेकीला हुलकावणी देत ही आघाडी 2-0 अशी केली. पूर्वार्धात एक संधी वाया घालविलेल्या लेवान्डोवस्कीने 59 व्या मिनिटाला लांब पल्ल्यावरून मारलेल्या फटक्याला ऱहॅडेकाने हाताने स्पर्श करून बाहेर घालविण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू गोललाईनवरून आत जाताना तो चकित होऊन पाहत राहिला. यानंतर लिव्हरकुसेनने जोर वाढविला आणि 64 व्या मिनिटाला बायर्नची आघाडी कमी करताना त्यांनी पहिले यश मिळविले. बेन्डरने हेडरवर हा गोल नोंदवला. लेवान्डोवस्कीने नंतर 89 व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा व संघाचा चौथा गोल नोंदवला. पेरिसिकच्या पासवर त्याने हा गोल केला. त्यानंतर वाढीव वेळेतील चौथ्या मिनिटाला अल्फोन्सो डेव्हिसने फाऊल केल्यानंतर मिळालेल्या पेनल्टीवर हॅवर्ट्झने लिव्हरकुसेनचा दुसरा गोल नोंदवला.