केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागिय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए धारवाड विभागिय ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाने ब संघाचा 7 गडय़ानी, अमृत पोतदार सीसीआयने बेळगाव स्पोर्ट्स अ संघाचा 50 धावांनी, बीडीके हुबळी अ संघाने युनियन जिमखानाचा 2 गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. झिनत एबीएम, अमेय भातकांडे, शिशीर भवानी, डॉमनिक फर्नांडिस यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
ऑटोनगर बेळगाव केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात अमृत पोतदार सीसीए संघाने 50 षटकात 9 गडी बाद 232 धावा केल्या. गौतम दिलीपने 50, रवी उकळीने 38, अमन खानने 36, वैभव कुरीबागीने 41, संदीप मुरारीने 22, तर स्वप्नील एळवेने 20 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्सतर्फे पार्थ पाटीलने 40 धावात 4, राहुल वाजंत्री, आकाश कटांबळे, ओमकार वेर्णेकर, अमर घाळी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाचा डाव 47.1 षटकात सर्व बाद 182 धावात आटोपला. सुदीप सातेरीने 47, अमर घाळीने 30, स्वयं अप्पण्णावरने नाबाद 20, शिवम नेसरीकरने 16 धावा केल्या. अमृत पोतदारतर्फे झिनत एबीएमने 37 धावात 4, वैभव कुरीबागीने 2, रोहित दोडवाड, स्वप्निल एळवे, रवी उकळी यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला.
हुबळीतील सामन्यात हुबळी क्रिकेट अकादमी ब संघाने 34.3 षटकात सर्व बाद 123 धावा केल्या. अमोद कोलवेने 48, पुनित दीक्षितने 20, मिलिंद रमेशने 13 धावा केल्या. हुबळी अ तर्फे डॉमनिक फर्नांडिसने 28 धावात 6 गडी बाद केले. रोहितकुमार एसी, आदर्श प्रकाश, चिराग नायक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाने 15.1 षटकात 3 बाद 125 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. चिराग नायकने नाबाद 39, सुधन्वा कुलकर्णीने 27, विठ्ठल हबिबने 18, रोहन यारिसिम्मीने 19 धावा केल्या. ब संघातर्फे मुदस्सर नझरने 2 तर पुनित दीक्षितने 1 गडी बाद केला.
हुबळीतील सामन्यात युनियन जिमखाना संघाने 48.4 षटकात सर्व बाद 219 धावा केल्या. अमेय भातकांडेने 4 षटकार, 15 चौकारासह 103 धावा करून शतक झळकविले. वरून दड्डीने 24, पुरूषोत्तम जकांबळने 36, चेतन चौगुलेने 19, सर्फराज मुल्लाने 14 धावा केल्या. बीडीकेतर्फे कृष्णा बगेडीने 60 धावात 4 तर केतज अरमोघम, हार्दिक ओझा, साहील सावडा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर बीडीके संघाने 48.2 षटकात 8 बाद 220 धावा करून सामना 2 गडय़ानी जिंकला. शिशीर भवानीने 8 चौकारासह 75, आदित्य पाटीलने 40, शुभम उमाजीने 35, साहील सावडाने 34 धावा केल्या. जिमखाना तर्फे गजानन निलजकरने 50 धावात 3 बळी मिळविले.