वृत्तसंस्था/ नागपूर
नागपूरचा युवा बुद्धिबळपटू संकल्प गुप्ताने आशियाई निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत रौप्यपदक मिळवून फिडेच्या 2020 च्या युवा ऑनलाईन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली.
नागपूरचा 17 वर्षीय युवा बुद्धिबळ मास्टर संकल्प गुप्ता फिडेच्या येत्या रविवारपासून सुरू होणाऱया पहिल्या ऑनलाईन विश्व युवा कॅडेट बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तीन दिवस चालणाऱया या स्पर्धेत विदर्भचा संकल्प गुप्ता 18 वर्षाखालील खुल्या वयोगटात भाग घेणार आहे. संकल्प गुप्ताने आतापर्यंत तीनवेळा आंतरराष्ट्रीय नॉर्म मिळविला आहे. आशियाई खंडीय निवड चांचणी स्पर्धेत संकल्प गुप्ताने भारताचा ग्रॅण्डमास्टर आणि टॉप सीडेड पी.इनियानसमवेत गुणवारीत समान साडेपाच गुणांसह संयुक्त आघाडीचे स्थान मिळविले. सात फेऱयांच्या या पात्रतेच्या स्पर्धेत प्रोग्रेसिव स्कोअरच्या आधारे तृतीय मानांकित संकल्प गुप्ताला दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. इराणच्या मेहदीने या स्पर्धेत कास्यपदक मिळविले.