विशेष आयुक्त रणदीप डी. यांची माहिती
प्रतिनिधी /बेंगळूर
वॉर्डनिहाय लसीकरण शिबिर आणि विशेष अभियानाद्वारे बेंगळूर शहरातील सर्व 198 वॉर्डामध्ये 84 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आता कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्यांच्या घरी जाऊन लस देण्याची योजना बेंगळूर महानगर पालिका आखत आहे. आम्ही ठेवलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक नागरिकांचे यापूर्वीच लसीकरण करण्यात आले असून आता आमचे लसीकरण धोरण बदलण्याची आवश्यकता आहे, असे मत महानगरपालिकेचे विशेष आयुक्त रणदीप डी. यांनी व्यक्त केले.
रणदीप पुढे म्हणाले, आम्ही लसीकरण शिबिरामध्ये लोकांची वाट पाहू शकत नाही. त्यामुळे आता आमचे पथक घरोघरी जाऊन नागरिकांचे लसीकरण करणार आहे. परंतु, यासाठी अद्याप कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. लवकरच घरोघरी जाऊन लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बेंगळुरातील लसीकरण शिबिराला कमी प्रतिसाद मिळत असल्याने शहरातील प्रत्येक वॉर्डासाठी लसीकरण पथकाची नेमणूक करीत आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये सरासरी 750 घरे असून आम्ही आमच्या लसीकरण योजनेनुसार त्याचा वापर करून घेत आहे. वॉर्डनिहाय आमचे पथक घरोघरी भेट देऊन उर्वरित नागरिकांना लस देणार आहे, असे त्यांनी सांगितले.
घरोघरी लसीकरण कार्यक्रमाद्वारे आजारी, अपंग असणाऱया नागरिकांपर्यंत पोहचू शकतो. वेळेअभावी आणि लस घेण्यास इच्छुक नसणाऱया नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करणार आहे. या कार्यक्रमाद्वारे लस न घेतलेल्या नागरिकांसह लसीकरण झालेल्या नागरिकांचीही संख्या मिळण्यास मदत होणार आहे, असेही आयुक्त रणदीप डी. म्हणाले.