नव्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्णय, 31 डिसेंबरपर्यंत अंमल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जगात हाहाकार माजविलेल्या कोरोना विषाणूचे एक नवे रूप ब्रिटनमध्ये आढळले आहे. त्याचा सध्याच्या कोरोना विषाणूपेक्षा जास्त वेगाने प्रसार होतो. ब्रिटनमध्ये या नव्या रूपातील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने होत असल्याने दक्षता म्हणून भारताने ब्रिटनमधून येणाऱया सर्व प्रवासी विमानांवर बंदी घातली आहे. ही बंदी 31 डिसेंबरपर्यंत असेल. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल.
भारताप्रमाणे फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, इटली, डेन्मार्क, बुल्गारिया आणि आयर्लंड या देशांनीही ब्रिटनहून येणाऱया विमानांवर बंदी घातली आहे. कोरोनाचे हे नवे रूप संशोधकांच्या लक्षात सप्टेंबरमध्येच आले होते. या नव्या कोरोनावर सध्याच्या लसींचा कसा परिणाम होईल याचा अभ्यास सुरू आहे.
घाबरण्याचे कारण नाही : आरोग्यमंत्री
नव्या रूपातील कोरोना विषाणूला घाबरण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी केले. भारत सरकार या घडामोडीसंबंधी आवश्यक ती सर्व दक्षता घेत असून प्रतिबंधात्मक उपायही केले जात आहेत. आरोग्य विभागाच्या उच्चस्तरीय सल्लागार समितीची बैठक सोमवारी संध्याकाळी झाली असून त्यात या नव्या रूपासंबंधी सखोल चर्चा करण्यात आली. जगातील इतर देशांशी या संदर्भात संपर्कात राहण्याचेही ठरविण्यात आले.
दिवसभरात 24,337 रूग्ण
रविवार संध्याकाळ ते सोमवार संध्याकाळ या 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे नवे 24 हजार 337 रूग्ण आढळले आहेत. तर 26 हजारांडून अधिक रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आता उपचाराधीन रूग्णांची संख्या 3 लाख 3 हजार पर्यंत खाली घसरली आहे. याच 24 तासांमध्ये कोरोनामुळे एकंदर 337 रूग्णांचा मृत्यू झाला. सोमवारी केरळ या एकाच राज्याने 5000 हून अधिक रूग्ण नोंद केले. आतापर्यंत 1 लाख 45 हजार 810 रूग्णांचा मृत्यू झाला असून 96 लाख 6 हजार 111 जण बरे झाले आहेत, अशी माहिती देण्यात आली.
जॉन्सन दौरा रद्द करा
येत्या गणतंत्रदिनी प्रमुख अतिथी म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ब्रिटनमधील कोरोनास्थिती पाहता जॉन्सन यांचा दौरा रद्द करावा अशी मागणी काँगेसने केंद्र सरकारल्कडे केली. तथापि, ती फेटाळण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले. जॉन्सन यांचा दौरा निर्धोक पार पडेल अशी अपेक्षाही केंद्र सरकारने या मागणीनंतर सरकारने व्यक्त केली.
लसीकरण पुढील महिन्यापासून ?
भारतात सार्वजनिक लसीकरण कार्यक्रम केव्हा सुरू होणार यासंबंधी अद्याप संदिग्धता आहे. डॉ. हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार लसीकरणाची प्रक्रिया जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱया आठवडय़ापासून सुरू होईल. भारताने तीन लस निर्मात्यांकडून अधिक माहिती मागविली असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. लोकांच्या आरोग्यासंबंधी कोणताही धोका पत्करणार नाही, असेही केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.