बहुतेक सर्व राज्यांचे स्पर्धक सहभागी होणार, सर्वसामान्यांमध्येही उत्सुकता
भुवनेश्वर / वृत्तसंस्था
ओडीशाची राजधानी भुवनेश्वर येथे गुरुवारपासून (11 नोव्हेंबर) प्रथम राष्ट्रीय योगस्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारताच्या बव्हंशी सर्व राज्यांमधून 500 हून अधिक स्पर्धक भाग घेणार आहेत. ही स्पर्धा 11 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर अशी तीन दिवस चालणार असून विजेत्याला चषक आणि पुरस्कार दिला जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय योगासन क्रिडा संस्था (एनवायएसएफ) आणि ओडीशा सरकार यांनी संयुक्तरित्या केले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये जगभरात योगव्यायाम अतिशय लोकप्रिय झाला आहे. भारतासह असंख्य देशांमध्ये आज कोटय़वधी योगपेमी सातत्याने योग व्यायाम करुन शरीर आणि मन निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. योगप्रसाराला प्रोत्साहन देण्यासाठी ही राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ती यशस्वी करण्यासाठी ओडीशा सरकारने गेले दोन महिने कठोर परिश्रम केले आहेत. ही स्पर्धा यशस्वी होईल असा विश्वास त्या राज्याचे क्रीडा मंत्री तुषारक्रांती बेहरा यांनी व्यक्त केला. स्पर्धेची सर्व सज्जता करण्यात आली आहे.
दोन श्रेणींमध्ये स्पर्धा
ही स्पर्धा महिला आणि पुरुष अशा दोन श्रेणींमध्ये घेतली जाईल. खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेतही योगासनांचा समावेश करण्यात आला आहे. भुवनेश्वर येथील स्पर्धेतून भविष्यकाळातील जागतिक गुणवत्तेचे योगस्पर्धक तयार होतील. तसेच तसेच भारतातील योगप्रतिभेचे संवर्धन होईल, असे केंद्र सरकारनेही स्पष्ट केले.
पहिलीच स्पर्धा
योगासने हा क्रीडाप्रकार मानला गेला आहे. राष्ट्रीय स्तरावरची या क्रीडाप्रकारातील ही प्रथम स्पर्धा आहे. या स्पर्धेतील गुणांकन पद्धती नेहमीच्या पद्धतीसारखीच असेल. त्यात काही सुधारणा करणे आवश्यक भासल्यास नंतरच्या स्पर्धांमध्ये ती करण्यात येईल. भविष्यकाळात अशा अनेक स्पर्धा आयोजित करण्याचा क्रीडाविभागाचा विचार आहे, असे एनवायएसएफचे अध्यक्ष उडिथ सेठ यांनी स्पष्ट केले. या स्पर्धेचे व्यवस्थापन आदर्श व्हावे यासाठी सज्जता आहे.