प्रतिनिधी / बेळगाव
मंथन कल्चरल ऍण्ड सोशल वेल्फेअर संस्थेतर्फे दि. 5 रोजी दुपारी 4.30 वा. मंथनच्या यूटय़ूब चॅनलवर पुण्याच्या ऋचा थत्ते यांचे व्याख्यान होणार आहे. ‘देणे पंचतत्वांचे’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. पंचतत्वावर आधारित कविता, कथा, संतवाणी यांची गुंफन या कार्यक्रमात असणार आहे. त्यांचा परिचय पुढीलप्रमाणे-
ऋचा थत्ते या कवयित्री, लेखिका, गीतकार, कॉपी रायटर आहेत. ललना मना- स्त्री कला निर्मितीची 700 वर्षे, भावसंगीताची वाटचाल, नाटय़ संगीताची वाटचाल, गीतरामायण मधुबाला ते माधुरी, नवरस यासह अनेक सांगीतिक कार्यक्रमांसाठी त्यांनी संहिता लेखन, निवेदन, निरुपण केले आहे. अनेक नामवंतांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या आहेत.
सूत्रसंचालन, भाषण कला, अभिवाचन याबाबत त्या कार्यशाळा घेतात. त्यांची 20 पुस्तके व 2 अल्बम प्रकाशित झाले आहेत. गीत लेखनासाठी त्यांना चित्र पदार्पणाचे नामांकन मिळाले आहे. एकपात्री सप्ताहाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून, त्या बालगंधर्व परिवार पुरस्काराच्या मानकरी आहेत. 2008 पासून त्या आकाशवाणीवर निवेदन करतात. पसायदान, मनाचे श्लोक, दासबोध, कबीरवाणी, स्वा. सावरकर, रामकथा, श्रीकृष्ण विठू माऊली, गणपती बाप्पा, संतवाणी या विषयावर त्या व्याख्याने देतात. सदर व्याख्यान कै. ऍड. रुस्तुम दारसशा रतनजी ऊर्फ गोलाखरी यांच्या स्मरणार्थ आयोजित केले आहे.