प्रतिनिधी/ मडगाव
मडगावच्या सत्र न्यायालयासमोरील एका इमारतीजवळ झालेले दुहेरी खून प्रकरणाचा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्याचा मडगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱयांनी आदेश दिला आहे.
न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार 3 फेब्रुवारी 2020 रोजी मध्यरात्रीच्या सुमाराला दोन युवकांच्या खून प्रकरणासबंधी पोलिसांनी कर्नाटकातील संशयित आरोपी अर्जुन मारुती काजीदोनी (30) याच्याविरुद्ध मडगावच्या कनिष्ठ न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.
मयतांची नावे रवी (20) व भीम (30) अशी असून सुनिल सावंत (45) याच्यावर याच संशयित आरोपीने खुनी हल्ला केल्याचा आरोप आहे. सुनिल सावंत मृत्यूच्या दाढीतून आश्चर्यकारक बचावला होता.
दारु दिली नाही म्हणून खून
न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार मडगावच्या आयकर कार्यालय इमारतीजवळ हा खुनाचा प्रकार घडला होता. रवी, भीम व सुनिल हे तिघेजण 3 फेब्रुवारी 2020 रोजी मध्यरात्रीच्या सुमाराला या जागी असलेल्या वालांकिनी बारमध्ये दारु घेत होते आणि रात्रीचे 11 वाजल्यानंतर बार मालकाने बार बंद केल्यामुळे वरील त्रिकूट बारच्या बाहेर बसून दारु घेत होते. त्यानंतर काही वेळात तेथे आरोपी अर्जुन आला होता. बार बंद झाल्याचे पाहून त्याने बारच्या बाहेर दारु घेत बसलेल्या या त्रिकुटाकडे दारु मागितली होती.
या त्रिकुटाने दारु देण्यास नकार दिल्याने आरोपी संतापला होता. वाद सुरु झाल्यानंतर हाणामारी सुरु होती आणि तेथेच असलेला एक वजनदार दगड आरोपीने उचलून भीम याच्या डोक्यावर हाणला होता. भीम जागीच ठार झाला होता. त्यानंतर आरोपीने फुटलेली बाटली रवी आणि सुनिल यांच्या पोटात खुपसली. त्यात रवी दगावला होता तर सुनिल गंभीररित्या जखमी झाला होता. सर्वजण ठार झाले असे समजून आरोपी तेथून पळाला होता.
रात्रभर सुनिल सावंत तेथेच रक्ताच्या थारोळय़ात पडलेला होता. दुसऱया दिवशी सकाळी ही घटना एकाने पाहिली आणि ती खबर पोलिसांच्या कानी घातली होती.
या दुहेरी खून प्रकरणाच्या तपासासाठी इतर काही पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचाऱयांना पाचारण करण्यात आले हाते. त्यात कुडचडे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रवी देसाई आणि पोलीस शिपाई अविनाश नाईक यांचाही समावेश होता.
गर्दीतून आरोपीला पकडले
घटनास्थळी इतर सर्व पोलीस अधिकारी असताना रवी देसाई आणि अविनाश नाईक हे दोघे एसजीपीडीए मार्केटच्या दिशने गेले होते. अविनाश नाईक यांची शोधक नजर सर्वत्र भिरभिरत होती. घटनेच्या जागी पोलीस अधिकारी जमले होते त्या जागेकडे अनेक लोक दूरवरुन कुतुहलापोटी पाहात होते. त्यात एक व्यक्ती अशी होती ज्याची उत्सुकता इतरापेक्षा ज्यादा होती.
पोलीस कर्मचारी अविनाश यांची नजर या व्यक्तीवर पडली व त्यांनी त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला ‘तो मी नव्हेच’ अशी भुमिका घेतलेल्या या संशयित व्यक्तीने नंतर गुन्हा कबुल केला होता. या व्यक्तीचे नाव अर्जुन मारुती काजीकोदी असल्याचे नंतर पोलिसांना समजले होते.