इंफाळ / वृत्तसंस्था
मणिपूरच्या नोनी जिल्हय़ात बुधवारी दौऱयावर जाणारी स्कूल बस उलटून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. मृतांमध्ये 5 विद्यार्थिनींचा समावेश आहे. ही घटना बुधवारी सकाळी 11.30 वाजता घडली.
यारीपोक येथील थंबलानू उच्च माध्यमिक विद्यालयाचे काही विद्यार्थी अभ्यास दौऱयाच्या निमित्ताने खौपूम येथे जात असताना स्कूलबसला भीषण अपघात झाला. बसमध्ये 36 विद्यार्थी आणि शिक्षकही होते. अभ्यास दौऱयावर जात असताना ओल्ड कछार मार्गावर बस पलटी झाली. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी या शोक व्यक्त केला आहे. एसडीआरएफ आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 22 विद्यार्थ्यांना इंफाळ येथील मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.