विहिरीत उडी टाकून संपविले जीवन
प्रतिनिधी /बेळगाव
मण्णीकेरी, ता. बेळगाव येथील एका विवाहितेने आपल्या अकरा महिन्यांच्या मुलीसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही. काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
कल्पना ऊर्फ लक्ष्मी मोहन गुडाजी (वय 21), तिची अकरा महिन्यांची मुलगी भूमिका अशी त्यांची नावे आहेत. गावाजवळील विहिरीत उडी टाकून या विवाहितेने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी, काकतीचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
रविवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास कल्पनाने आपल्या मुलीसह विहिरीत उडी टाकली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिच्या माहेरवासीयांना माहिती देण्यात आली. बिरनोळी येथील कुटुंबीय मण्णीकेरी येथे दाखल झाल्यानंतर त्यांच्यासमक्ष मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी ते सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठविण्यात आले.
यासंबंधी कल्पनाची आई यल्लव्वा भीमाप्पा नागार, रा. बिरनोळी यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षापूर्वी कल्पना आणि मोहन यांचे लग्न झाले होते. या दांपत्याला भूमिका हे एक अपत्यही झाले होते. मात्र, तिने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली याचा उलगडा झाला नाही. काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर पुढील तपास करीत आहेत.