महापालिकेच्या अधिकाऱयांची-त्यांच्या कुटुंबीयांची नावे वेगवेगळय़ा वॉर्डमधील मतदारयादीत समाविष्ट झाल्याचे निदर्शनास
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणुकीवेळी असंख्य मतदारांची नावे यादीमधून गायब असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. तसेच महापालिकेच्या अधिकाऱयांची व त्यांच्या कुटुंबीयांची नावे वेगवेगळय़ा वॉर्डमधील मतदारयादीत समाविष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणुकीच्या मतदारयादीत घोळ झाल्याचा प्रत्यक्ष अनुभव मनपाच्या अधिकाऱयांनादेखील आला आहे.
महापालिकेची वॉर्ड पुनर्रचना 2017 मध्ये करण्यात आली. मात्र घिसाडघाईने करण्यात आलेल्या मतदारयादीचा फटका नागरिकांना बसला. वॉर्ड पुनर्रचना केल्यानंतर घरोघरी जाऊन मतदारांची माहिती घेऊन मतदारयादी तयार करणे आवश्यक होते. मात्र एप्रिल महिन्यात मतदारयादी करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला सूचना केली होती. पण याच दरम्यान कोरोनाच्या दुसऱया लाटेला सुरुवात झाल्याने संपूर्ण राज्यात क्लोजडाऊन आणि नंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. परिणामी घरोघरी जाऊन मतदारयादी तयार करता आली नाही. महापालिकेच्या अधिकाऱयांनी तात्कालिक मतदारयादी तयार करून मतदारांची प्रत्यक्षात माहिती न घेताच याद्या तयार केल्या होत्या. त्यामुळे असंख्य मतदारांची नावे यादीमधून गहाळ झाल्याचे मतदानावेळी निदर्शनास आले.
तसेच काही मतदारांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे नाव एका वॉर्डमध्ये तर दुसऱया व्यक्तीचे नाव वेगळय़ा वॉर्डमध्ये समाविष्ट असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच वॉर्ड क्र. 24 मधील मतदारांची नावे वॉर्ड क्र. 16 मध्ये समाविष्ट झाल्याचे चव्हाटय़ावर आले होते. त्याचप्रमाणे वॉर्ड क्र. 39 मधील मतदारांची नावे वॉर्ड क्र. 49 मध्ये समाविष्ट झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर सदर मतदारांचा समावेश वॉर्ड क्र. 39 मध्ये करण्यात आला होता.
मतदारयादीच्या घोळाचा फटका मतदानावेळी मतदारांना आणि निवडणुकीच्या निकालानंतर काही उमेदवारांना देखील बसल्याचे निदर्शनास आले आहे. मतदारयादीत घोळ झाल्याचा प्रत्यक्ष अनुभव मनपा अधिकाऱयांनाही आला आहे. मनपाच्या आरोग्य अधिकाऱयांना व महसूल विभागात काम करणाऱया व्यवस्थापकांसह पर्यावरण साहाय्यक अभियंत्यांनाही यादीतील चुकांचा अनुभव आला आहे. आरोग्य अधिकाऱयांचे मतदान सदाशिवनगर परिसरात होते. महापालिका निवडणुकीवेळी बॉक्साईट रोडनजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे लागले. महसूल विभागात काम करणाऱया व्यवस्थापकांचे मतदान वॉर्ड क्र. 12 मध्ये येते. सदर व्यवस्थापक भाडेतत्त्वावरील घरात वास्तव्यास असून तळमजल्यावर राहणाऱया घरमालकांचे मतदान वॉर्ड क्र. 18 मध्ये समाविष्ट झाले होते. एकाच इमारतीत रहात असताना तळमजल्यात राहणाऱयांची नावे एका वॉर्डमध्ये तर पहिल्या मजल्यावर राहणाऱयांची नावे दुसऱया वॉर्डमध्ये समाविष्ट केल्याचे निदर्शनास आले. पर्यावरण साहाय्यक अभियंते वीरभद्रनगर येथे कुटुंबासह एकत्र राहतात. मात्र त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे वॉर्ड 18 मध्ये आणि पर्यावरण साहाय्यक अभियंत्यांचे नाव वॉर्ड 12 च्या मतदारयादीत समाविष्ट केल्याचा अनुभव आला. त्यामुळे एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळय़ा वॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे चव्हाटय़ावर आले आहे.