सहारनपूर ग्रामीणमधून लढविणार निवडणूक : अखिलेश यांनी नाकारली उमेदवारी
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला रामराम ठोकून समाजवादी पक्षात प्रवेश केलेले पश्चिम उत्तरप्रदेशमधील दिग्गज नेते मसूद अख्तर पुन्हा एकदा राजकीय पेचात सापडले आहेत. समाजवादी पक्षाकडून त्यांना अद्याप उमेदवारी देण्यात आलेली नाही. यामुळे मसूद पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार असल्याची चर्चा आहे. सहारनपूर ग्रामीणमधून मसूद निवडणूक लढवू शकतात.
याचबरोबर इम्रान मसूद यांना उमेदवारी न मिळाल्याने ते समाजवादी पक्ष सोडून बसपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मानले जात आहे. इम्रान मसूद यांनी पक्षातच रहावे अशी सप प्रमुख अखिलेश यादव यांची इच्छा आहे. सप सरकार सत्तेवर आल्यास भविष्यात मोठे पद देण्याचे आमिष त्यांना दाखविण्यात आले आहे. परंतु मसूद सध्या सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.
पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते इम्रान मसूद आणि त्यांचे समर्थक आमदार मसूद अख्तर यांनी 12 जानेवारी रोजी लखनौमध्ये समाजवादी पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतली होती. अखिलेश यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता.