प्रतिनिधी/ बेळगाव
समर्थनगर येथील एका महिलेला धमकावून तिच्याजवळील मोबाईल व रोकड लुटणाऱया टोळीतील आणखी एका तरुणाला खडेबाजार पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या चारवर पोहोचली आहे.
रमेश उर्फ अम्मू काशी जालगार (वय 23, रा. कपिलेश्वर मंदिरजवळ) असे त्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी बुधवारी ही कारवाई केली. दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. भा.दं.वि. 384 कलमान्वये त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी सुशांत उर्फ वाघ गोविंद कंग्राळकर (वय 21, रा. रघुनाथ पेठ, अनगोळ), मयूर उर्फ मर्डर म्हय्या सुभाष राऊत (वय 26, रा. दुसरा क्रॉस, महाद्वार रोड) यांना अटक करण्यात आली होती. 11 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी कपिलेश्वर मंदिरापाठीमागे ही घटना घडली होती.
सरस्वती मुनवळ्ळी (रा. समर्थनगर) या महिलेला धमकावून तिच्या जवळील मोबाईल संच व सहा हजार रुपये लुटण्यात आले होते. याप्रकरणी 29 डिसेंबर रोजी खडेबाजार पोलीस स्थानकात भा.दं.वि. 384 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी बुधवारी आणखी एकाला अटक केली आहे.