चुन्या मिश्रणात होणार नवीन काम : सिमेंटचा थर काढण्यास प्रारंभ
प्रतिनिधी / कोल्हापूर
युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असणार्या दुर्गराज रायगडवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने जतन, संवर्धनाची कामे सुरू आहेत. त्यातीलच एका महत्वाच्या कामाला सुरूवात झाली आहे. राजसरदेवर असणार्या मेघडंबरीच्या खालील जोत्याचे काम पारंपरिक पद्धतीने चुन्याच्या मिश्रणात करण्यात येणार आहे. त्यासाठी यापूर्वी टाकण्यात आलेला सिमेंट काँक्रिटचा थर खोदकाम करून काढण्यास सुरूवात झाली आहे.
मेघडंबरीच्या खालील जोत्यावर असणारा सिमेंटचा थर काढण्याच्या कामाला शुक्रवारी सुरूवात झाली. सिमेंटचा थर पूर्णपणे काढल्यानंतर या ठिकाणी रायगडच्या ऐतिहासिक सौदर्य आणि परंपरेला शोभेल असा चुन्याच्या मिश्रणातील थर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे रायगडला पूर्वीचा ऐतिहासिक काळातील रूप पुन्हा प्राप्त होण्यासही मदत होणार आहे. या कामामध्ये प्रामुख्याने जोत्यावरील जुन्या लाकडी खांबांच्या तळखड्यांच्या दगडांचे अवशेष योग्यारित्या जतन करण्यात येणार आहेत.
रायगड विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या प्रमुख कामांपैकी जोत्याच्या थराचे काम पुरातत्त्व खात्यामार्फत करण्यात येणार आहे. राजसदरेच्या ऐातिहासिक महत्त्वास व सौंदर्याला साजेसं असे हे काम असणार आहे.
– खासदार संभाजीराजे छत्रपती