अमेरिकेकडून पुतीन यांच्या मुलींवर निर्बंध
युरोपीय देशांकडूनही लवकरच घोषणा होणार
अमेरिकेने युपेनमधील युद्धगुन्हय़ांच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईच्या अंतर्गत रशियाच्या बँकांवर दंड वाढविण्यासह राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या दोन्ही मुलींना लक्ष्य करत निर्बंधांची घोषणा केली आहे. नव्या निर्णयाच्या अंतर्गत स्बरबँक आणि अल्फा बँकेला अमेरिकेच्या वित्तीय प्रणालीपासून दूर करण्यासोबत अमेरिकेच्या नागरिकांना या संस्थांशी व्यवहार करण्यापासून रोखण्यात आले आहे.
पुतीन यांच्या मुली मारिया आणि कॅटरिना तिखोनोव्हा तसेच पंतप्रधान मिखाइल मिशुस्टिन, रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांची पत्नी आणि मुलांसह रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सदस्य आणि माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांच्यावर अमेरिकेकडून निर्बंध लादण्यात आले. अमेरिकेने पुतीन यांच्या कुटुंबाच्या सर्व निकटवर्तीयांना स्वतःच्या वित्तीय प्रणालीपासून दूर केले आहे. तसेच अमेरिकेतील मालमत्ताही गोठविली आहे.
निर्बंध वाढविले जाणार
पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या विरोधात आणखीन कठोर निर्बंध लादण्याची तयारी केली आहे. तसेच युक्रेनला अधिक प्रमाणात शस्त्रास्त्रs पाठविण्यात येणार आहेत. रशियाला क्रूर हल्ला करण्यापासून रोखण्यास जग अपयशी ठरल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी निर्बंधांची व्याप्ती वाढविण्यासाठी कंबर कसली आहे.
युद्धगुन्हय़ाचे पुरावे जमविण्याचे काम
युक्रेनची राजधानी कीव्हनजीकच्या शहरांमध्ये रशियाकडून करण्यात आलेल्या युद्धगुन्हय़ांचे पुरावे जमविण्याचे काम अधिकारी करत आहेत. रशियाच्या सैनिकांनी माघार घेतल्यावर कीव्हनजीकच्या भागांमधील भूसुरुंग हटविण्याचे काम सध्या केले जातेय. कीव्हपासून 60 किलोमीटर अंतरावरील आंद्रिवकामध्ये अधिकाऱयांनी काही मृतदेह शोधले आहेत. तर मागील दोन दिवसांमध्ये माकारीव्ह भागात 20 मृतदेह आढळून आले आहेत. रशियाच्या सैनिकांकडून करण्यात आलेल्या युद्धगुन्हय़ांचे स्वरुप जाणून घेण्याचा प्रयत्न तपास अधिकारी करत असल्याचे कॅप्टन अला पुस्तोव्हा यानी सांगितले आहे.
ईयुकडून रशियाला मिळाली मोठी रक्कम
युरोपीय महासंघाने मान्य केले सत्य, युद्ध सुरू झाल्यानंतरची आकडेवारी
युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यावर युरोपीय महासंघाने रशियाला ऊर्जेची गरज भागविण्याच्या बदल्यात दरदिनी सुमारे 1 अब्ज युरो इतकी रक्कम दिली आहे. 24 फेब्रुवारीपासून रशियाला 35 अब्ज युरोइतकी रक्कम देण्यात आली असल्याची कबुली युरोपीय महासंघाच्या विदेश विषयक प्रमुखांनी दिली आहे.
युक्रेनला दिला जाणारा मदतनिधी रशियन गॅस आणि तेलावर खर्च करण्यात आलेल्या रकमेच्या तुलनेत कमी आहे. युरोपीय महासंघाने आतापर्यंत युक्रेनला 1 अब्ज युरोंची सैन्य उपकरणे पुरविली असल्याचे जोसेप बोरेल यांनी युरोपीय संसदेला सांगितले आहे. बोरेल यांनी रशियाकडून आयात होणाऱया कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या आयातीवर पूर्ण बंदी घालण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे.
युक्रेनला शस्त्रास्त्रs देण्याचे काम सुरूच ठेवावे लागेल. युक्रेन आमच्याकडून अधिक शस्त्रास्त्रांची अपेक्षा करतोय. 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनमध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून 27 देशांच्या महासंघाने रशियाला 35 अब्ज युरोंइतकी रक्कम दिली आहे. रशियन रणगाडे युक्रेनच्या सीमेत दाखल झाल्यापासून युरोपकडून पुतीन यांच्या खजिन्यात मोठी रक्कम जमा झाली असल्याचे बोरेल यांनी म्हटले आहे.
युरोपीय महासंघाने रशियाच्या विरोधात अनेक प्रकारच्या निर्बंधांची घोषणा केली आहे. तरीही युरोपीय महासंघाचे अनेक देश अद्याप रशियाचे कच्चे तेल आणि वायूवर अवलंबून आहेत. यात जर्मनी आणि ऑस्ट्रिया यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
युरोपीय महासंघ रशियाच्या विरोधात आणखीन अधिक निर्बंध लादणार आहे. यात रशियाकडून कच्चे तेल आणि वायूच्या होणाऱया आयातीवर बंदीचा निर्णय सामील असू शकतो, असे युरोपीय आयोगाच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी संसदेला संबोधित करताना म्हटले. रशियाच्या तेल आणि वायू पुरवठय़ावर निर्बंध लादण्यास युरोपीय महासंघाने टाळाटाळ चालविला होता. परंतु नरसंहारानंतर रशियाविरोधात कठोर निर्बंध लादण्यासाठी महासंघावरील दबाव वाढू लागला आहे.
मार्च महिन्यात युरोपीय देशांनी रशियाकडून 7.1 दशलक्ष टन थर्मल कोळशाची आयात केली होती. हा आकडा 2019 च्या तुलनेत 40 टक्के अधिक आहे. या कोळशाचा वापर वीज निर्मितीकरता केला जातो. युरोपीय महासंघ स्वतःच्या 45 टक्के कोळसा, सुमारे 45 टक्के गॅस आणि सुमारे 25 टक्के कच्चे तेलाच्या आयातीकरता रशियावर निर्भर आहे.
रशिया विरोधात ब्रिटनकडून कठोर निर्बंध
रशियावर आणखीन निर्बंध लादण्याची घोषणा ब्रिटनकडून करण्यात आली आहे. यात रशियातील सर्वात मोठी बँक स्बेरबँकेसोबतच्या व्यवहारावर पूर्ण बंदी आणि ब्रिटनकडून रशियात केली जाणारी गुंतवणून काढून घेणे सामील आहे. युक्रेनमधील बूचा शहरात रशियाच्या सैन्याकडून नागरिकांवर करण्यात आलेले हल्ले हे ‘नरसंहारा’पेक्षा कमी नसल्याचे विधान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केले होते. रशियाच्या सैनिकांनी माघार घेतल्यावर बूचा शहरात शेकडो मृतदेह आढळून आले होते. याप्रकरणी रशियावर जगभरातून टीका होत आहे. परंतु रशियाने नरसंहारात सामील नसल्याचा दावा केला आहे. बूचामध्ये काय घडले हे पाहिल्यावर धक्का बसतो. पुतीन यांनी युक्रेनमध्ये केलेल्या गोष्टी माझ्यासाठी नरसंहारापेक्षा कमी नसल्याचे जॉन्सन यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. ब्लादिमीर पुतीन यांच्या शासनावर अधिक निर्बंध आणि अधिक दंड ठोठावण्यासाठी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदाय एकत्र येणार असल्याचे जॉन्सन म्हणाले. पुतीन यांचे भयावह युद्ध समाप्त करण्याच्या ब्रिटनच्या मोहिमेला पुढे नेत आहोत, असे विदेशमंत्री लिस ट्रस यांनी म्हटले आहे.
कमांडर अजात्वेक बूचा नरसंहाराचा खलनायक
रशियन कमांडरकडून सामूहिक बलात्काराचा आदेश : 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुरुषांना ठार करा
रशियाच्या सेपरेट मोटराइज्ड रायफल ब्रिगेडचा कमांडर 40 वर्षीय अजात्बेक ओमुरबेकोव्ह हाच बूचा शहरातील नरसंहाराचा गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. रशियन पदकाने सन्मानित आणि ईश्वराला मानणाऱया अजात्बेकने सामूहिक बलात्कार आणि नरसंहाराचा आदेश दिला होता. 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या सर्व पुरुषांना मारून टाकण्यात यावे, असे त्याने रशियाच्या सैनिकांना सांगितले होते.
अजात्बेकला बूचाचा कसाई असे नाव जागतिक प्रसारमाध्यमांकडून देण्यात आले आहे. निष्पाप लोकांवर गोळय़ा झाडण्यास भाग पाडल्यावर अजात्बेकने संबंधितांच्या कुटुंबीयांना मृतदेह दफन करण्यासाठी केवळ 20 मिनिटांचा वेळ दिला होता, असे समोर आले आहे.
ओमुरबेकोव्हने मागील वर्षी ऑर्थोडॉक्स चर्चच्या पाद्रीकडून आशीर्वाद घेतला होता. आम्ही आमचे बहुतांश युद्ध स्वतःच्या आत्म्यासोबत लढत असतो. शस्त्र सर्वात महत्त्वाची गोष्ट नसल्याचे इतिहास सांगत असल्याचे ओमुरबुकोव्हने म्हटले हेते. युक्रेनच्या बूचामधील भयावह नरसंहाराने पूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
बळजबरीने कपडेही उतरविले
बूचामध्ये रशियाच्या सैनिकांकडून युद्धगुन्हे करण्यात आल्याचा आरोप केला जातोय. रशियाच्या सैनिकांनी शहरात पोहोचल्यावर दस्तऐवजांची मागणी केली. किंचित धोका दिसून आला तरीही रशियाच्या सैनिकांकडून नागरिकांना गोळय़ा घातल्या जात होत्या. रशियन सैनिकांनी आर्मी टॅटूच्या शोधात अनेक जणांना बळजबरीने कपडे उतरविण्यास भाग पाडले होते असे बूचाच्या रहिवाशांकडून सांगण्यात आले. परंतु रशियाने नरसंहाराचा आरोप फेटाळला आहे. युक्रेन लोकांच्या हत्येचे नाटक करत असल्याचा दावा रशियाकडून करण्यात येत आहे.
रशियाकडून पदकाने गौरव
ओमुरबेकोव्हला 2014 मध्ये रशियाचे उपसंरक्षणमंत्री दिमित्री बुल्गाकोव्ह यांनी उत्कृष्ट सेवेसाठी पदक देऊन गौरविले होते. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंतर्गत आर्मी कमांडर स्वतःच्या सैनिकांकडून करण्यात आलेल्या कुठल्याही प्रकारच्या युद्धगुन्हय़ांसाठी जबाबदार असतो.